सेंच्युरियन पार्क : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धातील बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 90 धावांपर्यत मजल मारली आहे. त्यामुळे पहिल्या डावातील 28 धावांची आघाडी मिळून तिसऱ्या दिवसअखेर 118 धावांची आघाडी जमा झाली आहे.
तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 307 धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डावालाही खराब सुरुवात झाली. जसप्रीत बुमराने मार्कराम (1) आणि हाशीम अमला (1) यांना माघारी धाडत दक्षिण आफ्रिकेला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र एबी डिव्हिलियर्स (खेळत आहे 50) आणि डीन एल्गर (खेळत आहे 36) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य 87 धावांची भागीदारी करून भारतीय संघाला यश मिळू दिले नाही.
भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला असून पहिल्या डावातील 335 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 28 धावांची छोटी आघाडी मिळाली आहे. चुकांमधून झटपट शिकण्याची कला अवगत असलेल्या विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी दीडशतकी खेळी साकारल्यामुळे भारताला 300 धावांपर्यंत मजल मारता आली. विराटने 217 चेंडूत 153 धावा तडकावल्या त्यात 15 चौकारांचा समावेश होता.
तिस-या दिवशी विराटला रविचंद्रन अश्विनचा (38) अपवाद वगळता कोणाचीही साथ मिळाली नाही. दोघांनी सातव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. इशांत शर्माने अवघ्या (3) धावा केल्या. पण कोहलीसोबत त्याने नवव्या विकेटसाठी 25 धावांची छोटेखानी उपयुक्त भागीदारी केली.
कोहलीने शेवटपर्यंत किल्ला लढवून इतरांसमोर आदर्श निर्माण केला. मॉर्केलला फटकावण्याच्या नादात कोहली सीमारेषेवर झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिकेककडून मॉर्केलने सर्वाधिक चार, महाराज, फिलँडर, रबाडा आणि निगिडीने प्रत्येकी एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताचा डाव सावरणा-या कर्णधार विराट कोहलीने तिस-या दिवसाचा खेळ सुरु होताच शानदार शतक झळकावले. विराटचे कसोटी क्रिकेटमधील हे 21 वे शतक आहे. हार्दिक पांडयाच्या रुपाने सोमवारी भारताला पहिला झटका बसला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात हार्दिक (15) धावांवर बाद झाला.
भारताच्या 200 पेक्षा जास्त धावा झाल्या असून भारताच्या सहा विकेट गेल्या आहेत. कर्णधार कोहली अजूनही खेळपट्टीवर पाय रोऊन उभा आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांवर संपुष्टात आला. भारत अजूनही 120 पेक्षा जास्त धावांनी पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने सावध सुरुवात केली. मात्र लोकेश राहुल (10) आणि चेतेश्वर पुजारा (0) हे पाठोपाठ माघारी परतल्याने भारताची अवस्था 2 बाद 28 अशी झाली. त्यानंतर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने 79 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र मुरली विजय 46 धावा काढून केशव महाराजची शिकार झाल्यावर भारताच्या डावाला पुन्हा गळती लागली. विजयपाठोपाठ रोहित शर्मा 10 आणि पार्थिव पटेल 19 धावांवर बाद झाले. त्यानंतर मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अधिक पडझड होऊ न देता खेळ संपेपर्यंत संघाचा डाव सावरून धरला.
तत्पूर्वी, रवीचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांवर आटोपला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने चार तर इशांत शर्माने 3 बळी टिपून यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात हाशिम आमला (82) व मार्कराम (94) यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशीच्या 6 बाद 269 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर यजमानांचे तळाचे फलंदाज फार चमक दाखवू शकले नाहीत. शमीने केशव महाराज (18) ची विकेट काढत दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. त्यानंतर एक बाजू लावून धरणाऱ्या कर्णधार फाफ डू प्लेसिसने कागिसो रबाडासोबत 42 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिलेला तीनशेपार पोहोचवले. या दरम्यान भारतीय क्षेत्ररक्षकांनीही गचाळ क्षेत्ररक्षण करत अनेक झेल सोडले त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव लांबण्यास मदत झाली. अखेर इशांत शर्माने कागिसो रबाडा (11) आणि डू प्लेसिस (63) यांना माघारी धाडले. तर अश्विनने डावातील चौथा बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचा डाव 335 धावांवर संपुष्टात आणला.
Web Title: Virat century after rain, South Africa lead 118 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.