Join us  

आफ्रिकेत 'विराट' झंझावात! भारताने वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा उडवला 5-1 ने धुव्वा

शार्दुल ठाकूरच्या (४/५२) भेदकतेनंतर रनमशीन विराट कोहलीच्या (१२९*) नाबाद शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात ८ गड्यांनी धुव्वा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 11:05 PM

Open in App

सेंच्युरियन : शार्दुल ठाकूरच्या (४/५२) भेदकतेनंतर रनमशीन विराट कोहलीच्या (१२९*) नाबाद शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात ८ गड्यांनी धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेवर ५-१ असा कब्जा करताना यजमानांना अक्षरश: रडवले. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेला २०४ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने ३२.१ षटकात केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले. सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर धावांचा पाठलाग करताना शिखर धवन (१८) आणि रोहित शर्मा (१५) या सलामीवीरांना अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. मात्र, यानंतर कोहलीने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना ३५वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय ‘विराट’ शतक झळकावले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना ९६ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांसहा १२९ धावांचा चोप दिला. अजिंक्य रहाणेनेही ५० चेंडूत ३ चौकारांसह नाबाद ३४ धावा करत कोहलीला अखेरपर्यंत साथ दिली. कोहलीच्या तडाख्यापासून यजमानांचा एकही गोलंदाज वाचला नाही. भारताचे दोन्ही बळी लुंगी एनगिडी याने घेतले. मात्र, इतर गोलंदाज अपयशी ठरल्याने यजमानांच एकदिवसीय मालिकेतील शेवटही पराभवाने झाला. कोहली - रहाणे यांनी १२६ धावांची नाबाद भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्का मारला. तत्पूर्वी, कारकिर्दीतील तिसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या शार्दुल ठाकूरच्या भेदक माºयापुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४६.५ षटकात २०४ धावांमध्ये संपुष्टात आला. नाणेफेक जिंकून कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर युवा शार्दुलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना कर्णधार एडेन मार्करम (२४), हाशिम आमला (१०), फरहान बहारदीन (१) आणि अँडिले फेहलुकवायो (३४) असे महत्त्वाचे चार बळी मिळवत यजमानांचे कंबरडे मोडले. कोणत्याही दडपणाविना आक्रमक मारा करताना शार्दुलने आफिकन फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले. त्याचवेळी ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेत यजमानाच्या फलंदाजीतील हवा काढली. आफ्रिका दौºयात कसोटी मालिकेपासून चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय गोलंदाजांपुढे पुन्हा एकदा यजमानांचे फलंदाज चाचपडताना दिसले. मधल्या फळीतील खायेलिहले झोंडो याने झळकावलेल्या संयमी अर्धशतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकानुसार खेळ करता आला नाही. झोंडोने ७४ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा काढल्या. यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेन याने ४० चेंडूत २२ धावांची संथ खेळी केली.  (वृत्तसंस्था)धावफलक :दक्षिण आफ्रिका : एडेन मार्करम झे. अय्यर गो. शार्दुल २४, हाशिम आमला झे. धोनी गो. शार्दुल १०, एबी डिव्हिलियर्स त्रि. गो. चहल ३०, खायेलिहले झोंडो झे. हार्दिक गो. चहल ५४, हेन्रिक क्लासेन झे. कोहली गो. बुमराह २२, फरहान बहारदीन झे. बुमराह गो. शार्दुल १, ख्रिस मॉरिस झे. धवन गो. कुलदीप ४, अँडिले फेहलुकवायो झे. व गो. शार्दुल ३४, मॉर्नी मॉर्केल झे. अय्यर गो. हार्दिक २०, इम्रान ताहिर झे. कोहली गो. बुमराह २, लुंगी एनगिडी नाबाद ०. अवांतर - ३. एकूण : ४६.५ षटकात सर्वबाद २०४ धावा.बाद क्रम : १-२३, २-४३, ३-१०५, ४-१३५, ५-१३६, ६-१४२, ७-१५१, ८-१८७, ९-१९२, १०-२०४.गोलंदाजी : शार्दुल ठाकूर ८.५-०-५२-४; जसप्रीत बुमराह ८-१-२४-२; हार्दिक पांड्या १०-०-३९-१; कुलदीप यादव १०-०-५१-१; युझवेंद्र चहल १०-०-३८-२.भारत : शिखर धवन झे. झोंडो गो. एनगिडी १८, रोहित शर्मा झे. क्लासेन गो. एनगिडी १५, विराट कोहली नाबाद १२९, अजिंक्य रहाणे नाबाद ३४. अवांतर - १०. एकूण : ३२.१ षटकात २ बाद २०६ धावा.बाद क्रम : १-१९, २-८०.गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल ७-०-४२-०; लुंगी एनगिडी ८-१-५४-२; ख्रिस मॉरिस ६-०-३६-०; अँडिले फेहलुकवायो ४-०-२७-०; इम्रान ताहिर ७.१-०-४२-०.महत्त्वाचे...- या मालिकेत ३ किंवा त्याहून अधिक बळी घेणारा शार्दुल पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.- याआधी २००८ साली तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत किमान अर्धशतकी खेळ करण्यात एबी डिव्हिलियर्स अपयशी ठरला होता. या मालिकेत त्याने २६, ६ आणि ३० अशा धावा काढल्या.- कोणत्याही द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत ५०० हून अधिक धावा काढणारा कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला.- कोहलीने अशी कामगिरी करताना भारताच्याच रोहित शर्माचा (४९१, आॅस्टेÑलियाविरुद्ध) विक्रम मोडला.- या मालिकेत कोहलीने तीन शतकांसह ५०० धावांचा टप्पा पार केला.

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहली