मुंबई, दि. 29- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने श्रीलंके विरूद्धच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी शानदार शतक झळकावलं. विराटने 136 बॉल्समध्ये नॉटआऊट 103 रन्स करत शतकी खेळी केली आहे. गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी विराटनं ठोकलेलं शतक त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं १७वं शतक आहे. तर, कॅप्टन म्हणून त्याचं हे दहावं कसोटी शतक आहे. कॅप्टन कोहलीने इनिंगच्या सुरूवातीपासूनच धमाकेदार खेळी करत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. भारत विरूद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेपुढे विजयासाठी 550 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. कसोटीच्या सुरूवातीला कमी पडलेल्या विराटने सामन्यात दमदार पुनरागमन करत शतक झळकावलं. गॉलमध्ये विराटने इतिहासाची पुनरावृत्ती केल्याचं बघायला मिळतं आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात विराटचं हे दुसरं शतक आहे. याआधी गॉलमध्येच विराटने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात पहिलं शतक झळकावलं होतं. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेला कसोटी सामना आणि 2015 मध्ये गॉलमध्ये झालेल्या कसोटीत बरंच साम्य आहे. 2015 मधील कसोटी सामन्यात विराटने पहिल्या इनिंगमध्ये 3 रन्स केले होते आणि त्यानंतर शतक झळकावलं होतं. सध्या सुरू असलेल्या कसोटीमध्येही विराटने तशीच कामगिरी केली आहे. जर दोन्हीही कसोटीमधील विराटच्या रन्सकडे पाहिलं तर ते समान असल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅप्टन विराट कोहली आत्तापर्यंत 58 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 17 शतकं, 14 अर्धशतकांच्या मदतीने 4609 रन्स केले आहेत. तसंच आत्तापर्यंत 4 वेळा त्याने डबल सेंन्चुरी केली आहे. कसोटीतील त्याचा सर्वौत्तम स्कोअर 235 रन्सचा आहे.
मोहम्मद अझरूद्दीनचाही रेकॉर्ड मोडलाविराट कोहलीने टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. कॅप्टन म्हणून अझहरनं ६८ डावांमध्ये 9 शतकं झळकावली. विराटनं गॉल टेस्टमध्ये दहावं शतक करून अझहरला मागे टाकलं. विशेष म्हणजे, विराटनं ही शतकं अवघ्या ४४ डावांमध्ये केली आहेत. भारताकडून टेस्ट कॅप्टन म्हणून सर्वाधिक कसोटी शतकं करण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावे आहे. त्यांनी ७४ डावांमध्ये ११ शतकं झळकावली.गावसकर यांचा ११ शतकांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त दोन शतकाची गरज आहे. कॅप्टन कोहलीची खेळी पाहता तो लवकरच रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल, अशी चर्चा त्याच्या फॅन्समध्ये सुरू झाली आहे.
कसोटीवर भारताची मजबूत पकड
गॉल कसोटीमध्ये सध्या टीम इंडियाची मजबूत पकड बघायला मिळतं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत, भारताने विराट कोहलीच्या नाबाद शतकानंतर, दुसरा डाव 3 बाद 240 धावांवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील 309 धावांची आघाडी पकडता, आता लंकेसमोर विजयासाठी 550 धावांचं लक्ष्य आहे. भारताने आज 3 बाद 189 धावांवरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. कोहलीने चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला झटपट खेळी करत, शतक पूर्ण केलं. हे त्याचं कारकिर्दीतील 17 वं कसोटी शतक ठरलं. कोहलीने 133 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्यानंतर अवघ्या तीन धावा केल्यानंतर कोहलीने डाव घोषित करुन, श्रीलंकेला राऊंड फिगर 550 धावांचं आव्हान दिलं.