Virat Kohli 100th Test : भारताचा माजी क्रिकेटपटू विराट कोहली श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत आपला १००वा कसोटी सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी सारेच क्रिकेटरसिक उत्सुक आहेत. मोहालीत होणाऱ्या या सामन्यासाठी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकही स्टेडियममध्ये हजेरी लावणार आहे. या विशेष सामन्याआधी BCCI ने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात महान माजी खेळाडूंनी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या व्हिडीओमध्ये विरेंद्र सेहवागने कोहलीला आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्यामुळे त्याची खूपच चर्चा आहे.
"मी जेव्हा कसोटी खेळायला सुरूवात केली तेव्हा माझं एकच लक्ष्य होतं की मला दिल्लीकडून १०० कसोटी सामने खेळणारा पहिला खेळाडू बनायचं आहे. माझ्यानंतर १०० कसोटी सामने दिल्लीच्या इशांत शर्माने खेळले आणि आता विराटही हा पराक्रम करणार आहे. विराटच्या सुरूवातीच्या रणजी सामन्यांमध्ये मी त्याचा कर्णधार होतो. मी त्याला खेळताना पाहिलं होतं. त्याने भारतीय संघाला कसोटीमध्ये एका वेगळ्याच उंचीवर नेलं. मी तर एवढंच म्हणेन की हाजमे की गोली, त्योहार में होली और बॅटिंग में कोहली पुरे भारत को पसंद है", अशा सेहवाग-स्पेशल स्टाईल शुभेच्छा त्याने विराटला दिल्या.
दरम्यान, या खास व्हिडीओमध्ये सेहवाग व्यतिरिक्त महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, इशांत शर्मा आणि हरभजन सिंग या शतकी कसोटीवीरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.