मोहाली : जागतिक क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम रचणारा विराट कोहली शुक्रवारी कारकिर्दीतील विक्रमी शंभरावा कसोटी सामना खेळण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल. त्याच वेळी, भारताचा ३५वा कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्मा आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल. या सामन्यात दणदणीत विजय मिळवून आपल्या नेतृत्वाची धमाकेदार सुरुवात करण्याचा रोहितचा निर्धार असेल.
सुमारे अडीच वर्षांहून अधिक काळ कोहलीला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळी करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे आपल्या शंभराव्या कसोटीत तो शतक झळकावेल, असा विश्वास क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. श्रीलंकेचा गोलंदाजी मारा फारसा मजबूत नसल्याने कोहलीला शतक ठोकण्यास फारशी अडचण येणार नाही. सुरंगा लखमल, लाहिरु कुमारा आणि लेसिथ एम्बुलडेनिया यांचा समावेश असलेल्या गोलंदाजांविरुद्ध खेळणे कोहलीला फार कठीण जाणार नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने कारकीर्दीत शंभराव्या कसोटीत दोन्ही डावात शतके झळकाविली. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
इंग्लंडचे सर्वाधिक १५ खेळाडू
- १०० कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये इंग्लंडचे सर्वाधिक १५ खेळाडू आहेत. त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया १३, भारत १२,वेस्ट इंडिज ९, दक्षिण आफ्रिका ८,पाकिस्तान ५, श्रीलंका ५ आणि न्यूझीलंडच्या ४ खेळाडूंचा समावेश आहे.
सर्वाधिक कसोटी खेळणारे सध्याचे खेळाडू
- जेम्स ॲन्डरसन इंग्लंड १६९
- स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड १५२
- ज्यो रुट इंग्लंड ११४
- नाथन लियोन ऑस्ट्रेलिया १०५
- ईशांत शर्मा भारत १०५
१०० व्या कसोटीतील शतकवीर
- मायकेल काउड्री (इंग्लंड)
- जावेद मियांदाद (पाकिस्तान)
- गार्डन ग्रीनिज (वेस्टइंडीज)
- ॲलेक स्टीवर्ट (इंग्लंड)
- इंजमाम-उल-हक (पाकिस्तान)
- रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया)
- ग्रीम स्मिथ (दक्षिण आफ्रिका)
- हाशिम अमला (दक्षिण आफ्रिका)
- ज्यो रूट (इंग्लंड)
दुसरीकडे, रोहितच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष असेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहितने छाप पाडली असली तरी, कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपद त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. भारतीय संघाला लंकेविरुद्धच्या मालिकेत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंची कमतरताही भासेल. त्यामुळे यांच्या अनुपस्थितीमध्ये रोहितला कोहलीची मोठी मदत होईल.
संघ व्यवस्थापनाची परीक्षा
पुजाराच्या अनुपस्थितीत शुभमन गिलला तिसऱ्या स्थानी खेळण्याची संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. तसेच रहाणेच्या पाचव्या स्थानासाठी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांचा पर्याय आहे. विहारीने विदेशात दमदार कामगिरी करत आपली क्षमता दाखवली आहे. मात्र, अय्यरने मायदेशात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पणातच शतक ठोकून प्रभावित केले होते. त्यामुळे दोघांपैकी एकाची निवड करताना संघव्यवस्थापनाची कसोटी लागेल. पाचव्या क्रमांकासाठी डावखुऱ्या ऋषभ पंतचाही विचार होऊ शकतो. कारण त्याच्यामुळे भारताला उजव्या व डावखुऱ्या हाताच्या फलंदाजी जोडीचा पर्याय उपलब्ध होईल.
लंकेची त्रिमूर्ती
श्रीलंकेची फलंदाजी तीन अनुभवी खेळाडूंवर अवलंबून आहे. कर्णधार दिमुथ करुणारत्ने, अनुभवी दिनेश चंदिमल आणि अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज यांच्यावर लंकेची फलंदाजी निर्भर आहे. त्यातच खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्याने श्रीलंकेचे फलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा सामना कशा प्रकारे करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
कसोटी यशाचे श्रेय विराटला -रोहित शर्मा
‘भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरी केली आहे. संघाला इतक्या चांगल्या स्थितीत आणण्याचे संपूर्ण श्रेय विराट कोहलीला जाते,’ असे सांगत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने विराट कोहलीला विक्रमी शंभराव्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. कसोटी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थितीत राहिलेल्या रोहितने गुरुवारी सांगितले की, ‘एक संघ म्हणून आम्ही खूप चांगल्या स्थितीत आहोत. क्रिकेटच्या या प्रकारात सध्या आम्ही ज्या स्थानी आहोत, त्याचे पूर्ण श्रेय कोहलीला जाते. इतक्या वर्षांमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये संघासाठी जी काही कामगिरी केली, ती शानदार होती.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, हनुमा विहारी, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, उमेश यादव, सौरभ कुमार आणि प्रियांक पांचाल.
श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, चरित असलंका, दुश्मंता चमीरा, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, लसिथ एम्बुलडेनिया, विश्व फर्नांडो, सुरंगा लखमल, लाहिरू थिरिमाने, लाहिरू कुमारा, कुसाल मेंडिस, पाथुम निसांका, जेफ्री वंडारसे, प्रवीण जयविक्रमा आणि चमिका करुणारत्ने.
Web Title: virat kohli 100th test in india vs sri lanka test series in mohali
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.