Virat Kohli 100th Test, IND vs SL Test : भारतीय संघ उद्यापासून (४ मार्च) श्रीलंकेशी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर खेळण्यात येणार आहे. विराट कोहलीचा हा १००वा सामना असणार आहे. त्याशिवाय रोहित शर्मा (Rohit Sharma) साठीही कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे रोहितच्या या सामन्याविषयी नक्की कशा भावना आहेत, त्याबद्दल त्याने पत्रकार परिषदेत सांगितलं.
"खरं सांगायचं तर मी सामने जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. योग्य खेळाडूला योग्य वेळी संधी देणं याकडे माझं लक्ष असेल. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ सध्या खूपच चांगल्या स्थितीत आहे. त्याचं श्रेय विराट कोहलीलाच जातं. मला आता फक्त त्याने बनवलेला संघ आणि मिळवलेली प्रतिष्ठा पुढे टिकवून ठेवायची आहे आणि अधिक उंचीवर न्यायची आहे. संघ म्हणून आम्हाला अधिक भक्कम व्हायचं आहे आणि आमच्या भूतकाळात झालेल्या चुका सुधारायच्या आहेत", असं रोहितने स्पष्टपणे सांगितलं.
विराटला १००व्या कसोटीसाठी दिल्या शुभेच्छा
विराटची १००वी कसोटी हा अविस्मरणीय क्षण असणार आहे. त्याचा प्रवास खूपच उल्लेखनीय आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्याला कसोटी क्रिकेट खेळताना पाहणं हे कायमच सुखावणारं असतं. त्याची ही कसोटी खास बनवण्यासाठी आमचा संघ प्रयत्नशील आहे, असं रोहित म्हणाला.
पहिल्या कसोटीत कोणता संघ उतरणार?
पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ मध्ये कोण असतील ते मी आता सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सामन्याची वाट पाहावी लागेल. संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या जागी तिसऱ्या व पाचव्या क्रमांकासाठी खेळेल, त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. रहाणे व पुजारा यांचा पुढील मालिकांसाठी नक्कीच विचार केला जाईल. त्यांच्या कामगिरीवर भारतीय निवड समितीचं लक्ष आहे, असं सूचक वक्तव्य हिटमॅनने केलं.