Virat Kohli 100th Test : भारताचा माजी क्रिकेटपटू विराट कोहली याने काही दिवसांपूर्वीच कर्णधारपदाचा पदभार सोडला. त्यानंतर रोहित शर्माकडे तीनही फॉरमॅटमधील कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. ४ मार्चपासून सुरू होणारी श्रीलंका मालिका ही रोहितसाठी कसोटी कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. त्यात विशेष बाब म्हणजे मालिकेतील पहिला सामना हा विराट कोहलीची १००वी कसोटी असणार आहे. या खास सामन्याआधी BCCIने एक विशेष व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये विराटबद्दल भारतीय संघातील महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग या चौघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातच सचिनने एक झकास किस्सा सांगितला.
'मला चांगलं आठवतंय की मी विराटचं नाव सर्वप्रथम २००७ साली ऐकलं. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये मालिका खेळत होतो. त्यावेळी विराटचा संघ मलेशियामध्ये U19 वर्ल्ड कप खेळत होता. त्या स्पर्धेतील विराटच्या खेळीची आमच्या ड्रेसिंग रूममध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळीच आम्ही म्हटलं होतं की हा झकास फलंदाजी करतो. हा नक्कीच इतिहास घडवेल', असा एक भन्नाट किस्सा सचिनने खास व्हिडीओमध्ये सांगितला. पाहा व्हिडीओ-
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानेही विराटला शुभेच्छा दिल्या. '१ कसोटी खेळणं ही उत्तम गोष्ट आहे. पण १०० कसोटी सामने खेळणं ही अतिउत्तम आणि सर्वोकृष्ट बाब आहे', असं राहुल द्रविड व्हिडीओमध्ये म्हणाला. तसेच, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानेही विराटच्या या खास कामगिरीसाठी त्याला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.