भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने ४ मार्चला आपल्या १००व्या कसोटीसाठी मैदानात प्रवेश केला. सामना सुरू होण्याआधी या विशेष कामगिरीसाठी त्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्याला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरवलं. विराटची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हीदेखील या खास प्रसंगी हजर होती. त्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि विराटने दमदार खेळाला सुरूवात केली. पण तो ज्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला, ते पाहून तो स्वत:सुद्धा हैराण झाला.
दोन गडी बाद झाल्यावर विराट मैदानात आला. सुरुवातीला संथ गतीने खेळ केल्यानंतर मग विराटला सूर गवसला. एकेरी दुहेरी धावा घेत आणि वेळप्रसंगी चौकार लगावत त्याने दमदार खेळाला सुरूवात केली. आपल्या विशेष कसोटी विराट अर्धशतकाच्या जवळ पोहोचला असतानाच नेमका ४५ धावांवर त्याला बाद व्हावं लागलं. एम्बुलडेनिया याने विराटला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. महत्त्वाची बाब म्हणजे, चेंडू नक्की कसा आला आणि कसा दांडी गुल करून गेला, हे विराटला अजिबातच कळलं नाही. त्यामुळे विराट अक्षरश: हैराण होऊन चेंडकडे बघत राहिला. पाहा विराट बोल्ड झाला तो व्हिडीओ-
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना चहापानाच्या सत्रापर्यंत ४ गड्यांच्या मोबदल्यात द्विशतकी मजल मारली होती. मयंक अग्रवाल (३३) आणि रोहित शर्मा (२९) यांना चांगली सुरूवात मिळाली पण त्याचं मोठ्या खेळीत रूपांतर करणं त्यांना जमलं नाही. हनुमा विहारीने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दमदार अर्धशतक ठोकलं. तो ५८ धावांवर बाद झाला. तर विराटला अर्धशतकाने हुलकावणी दिली.