नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणारी पहिली कसोटी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. हा सामना भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याची १०० वी कसोटी ठरणार आहे. त्यामुळेच बीसीसीआयने या सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी विराट कोहली कर्णधार असताना त्याच्यात आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सौरव गांगुली या सामन्याला उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींकडून विचारण्यात येत आहे.
विराट कोहली कर्णधार असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. विराटने कर्णधारपदाबाबत सौरव गांगुलींचे दावे फेटाळून लावले होते. त्यामुळेच आता सगळा विवाद विसरून बीसीसीआय अध्यक्ष विराटच्या १०० व्या कसोटीला उपस्थित राहतील का, अशी विचारणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह लंडनमध्ये गेलेले सौरव गांगुली हे चंदिगड येथे पोहोचतील. त्यांन इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार सौरव गांगुली हे विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्यामध्ये सहभागी होणार आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी विराटने टी-२० कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात असताना विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिका आटोपल्यानंतर विराटने कसोटी कर्णधारपद सोडले होते.
दरम्यान या वादाबाबत सौरव गांगुलीने सांगितले होते की, मी विराट कोहलीला टी-२० कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र प्रेस कॉन्फ्रन्समध्ये विराट कोहलीने ही बाब फेटाळून लावली होती. तसेच एकदिवसीय संघ जाहीर करण्यापूर्वी कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले, असा दावाही विराटने केला होता. तेव्हाच विराट आणि बीसीसीआयमध्ये काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते.