भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर विराट कोहलीचं १४ वर्षांपूर्वीचं एक जुनं ट्विट सध्या नव्यानं चर्चेत आले आहे. या ट्विटचं थेट कनेक्शन हे आगामी दुलीप करंडक दुलीप करंडक या देशांतर्गत स्पर्धेशी आहे.
किंग कोहलीचं जुनं ट्विट नव्यानं होतंय व्हायरल
कोहली बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल, अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. त्यामुळेच त्याचे जुनं ट्विट व्हायरल होताना दिसते. या जुन्या ट्विटचा दाखला देत सोशल मीडियावर त्याला बेस्ट ऑफ लकही देण्यात येत आहे.
मोठा ब्रेक, त्यात विराटला मिळेल छोटी पण उपयुक्त ठरेल अशी संधी
श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना ४३ दिवसांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. भारतीय संघ १९ सप्टेंबरला घरच्या मैदानात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेआधी भारतीय संघातील अनेक स्टार दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन वगळता जवळपास सर्वच स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे बोलले जाते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील इथं झुकतं माप असेल. म्हणजे खेळायचे की, नाही ते त्यांच्यावर अवलंबून असेल. पण विराट कोहली नक्कीच पुन्हा एकदा देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
किंग कोहलीची व्हायरल होणारी जुनी पोस्ट
कोहलीनं २०१० मध्ये अखेरची देशांतर्गत स्पर्धा खेळली होती. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्याने आपल्या त्यावेळीचे ट्विटर (सध्याचं एक्स) अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने लिहिले होते की, दुलीप ट्रॉफीसाठी तुमच्या शुभेच्छा पाठिशी असुद्या, असा उल्लेख करण्यात आला होता. तो पुन्हा ही स्पर्धा खेळताना दिसेल, हे चित्र निर्माण झाल्यामुळे त्याची ही जुनी पोस्ट नव्याने व्हायरल होताना दिसते. लोक त्याला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छाही देऊ लागले आहेत. या स्पर्धेतून तुझा फॉर्म परत येवो, अशा काही कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.
विराट कोहलीसह चाहत्यांसाठीही ही सुवर्ण संधी
विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नावाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. ३ सामन्यांच्या मालिकेत त्याने फक्त ५८ धावा काढल्या. ही मालिका भारतीय संघाने ०-२ अशी गमावली होती. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेआधी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणं कोहलीसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. ५ सप्टेंबरपासून पासून रंगणाऱ्या या स्पर्धेचे सामने हे आधी हैदराबादच्या अनंतपूर येथे नियोजित होते. पण लॉजिस्टिक समस्या टाळण्यासाठी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने खेळवण्यात येणार आहेत. जर विराट या स्पर्धेत खेळला तर चाहत्यांसाठीही तो खास क्षण असेल.