नवी दिल्ली-
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आराम करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याला आराम देण्यात आला. तो आता वनडे मालिकेतून संघात पुनरागमन करेल. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांची वनडे मालिका १० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यात कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
आता विराट कोहलीबाबत भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू के.श्रीकांत यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. गौतम गंभीरनं ज्यापद्धतीनं २०११ सालच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. तशीच कामगिरी यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीकडून पाहायला मिळेल, असं के.श्रीकांत म्हणाले. गौतम गंभीरची २०११ सालच्या वर्ल्डकपमधील कामगिरी भारतासाठी गेमचेंजर ठरली होती.
फायनलमध्ये गंभीरनं केली होती कमालगौतम गंभीरनं २०११ सालच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरोधात ९७ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली होती. आता विराट कोहलीकडे मिशन वर्ल्डकप २०२३ साठी भारतीय संघातील प्रमुख खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. भारतीय संघानं आयसीसीची स्पर्धा जिंकून आता ९ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
मी भविष्यवाणी करतोय की...स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत श्रीकांत म्हणाले की, "एक खेळाडू म्हणून ८३ सालचा वर्ल्डकप जिंकणं आणि २०११ साली विश्वचषक विजेत्या संघाच्या निवड समितीचा प्रमुख असणं हे खूप मोठं सूख अनुभवता आलं. ही एक अशी गोष्ट आहे की जी मी माझ्या नातवंडांना अभिमानानं सांगू शकतो. गौतम गंभीरनं २०११ सालच्या वर्ल्डकप फायनलमध्ये केलेली कामगिरी अभूतपूर्व होती. संपूर्ण स्पर्धेत त्यानं जबरदस्त फलंदाजी केली. मी भविष्यवाणी करतो की विराट कोहली आपल्याला २०२३ वर्ल्डकपमध्येही अशीच कामगिरी करताना दिसेल"
कोहली युवा खेळाडूंना पुढे घेऊन जाईलविराट कोहली यंदाच्या वर्ल्डकपमध्ये युवा खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याची भूमिका बजावेल असंही श्रीकांत म्हणाले. कोहली स्वत: जबाबदारी घेऊन सर्वांना पुढे घेऊन जाईल आणि ईशान किशनसारख्या युवा खेळाडूंना स्वातंत्र्य देईल, असं ते म्हणाले.
"कोहली इशान किशनसारख्या युवा खेळाडूंना मदत करेल. इशाननं जसं द्विशतकी खेळी साकारली तसंच तो बिनधास्तपणे खेळताना दिसेल. हे सारं तुम्ही किती मोकळेपणाने खेळता यावर सरां अवलंबून आहे. तो मोकळेपणा कोहली इतर युवा खेळाडूंना देईल", असं श्रीकांत म्हणाले.