मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश डे नाइट कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं विजय मिळवला. भारतानं दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली आहे. भारतीय संघ 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पण तरीदेखील या स्पर्धेत काही बदल करण्याचा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिला आहे. आता त्याचा हा सल्ला आयसीसी ऐकणार का, हे सर्वात महत्वाचे आहे.
कोहली म्हणाला की, " आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत काही बदल करायला हवे, असे मला वाटते. जर एखाद्या संघाबरोबर आम्ही आमच्या देशात कसोटी मालिका खेळलो तर त्यांच्या देशामध्येही मालिका खेळवली जायला हवी. कारण आम्ही आतापर्यंत फक्त दोन वेळा भारताबाहेर खेळलो आहोत."
ICC Test Championship Points Table: टीम इंडियाचे अव्वल स्थान बळकट, पण ऑस्ट्रेलियाही आली शर्यतीतभारतीय संघानं मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज ( 2-0), दक्षिण आफ्रिका ( 3-0) आणि बांगलादेश ( 2-0) यांच्यावर निर्भेळ यश मिळवलं आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आतापर्यंत सर्वच्या सर्व सात सामने जिंकले आहेत. या गुणतालिकेत अपराजित राहिलेला हा एकमेव संघ आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एका मालिकेला 120 गुण दिले जातात आणि भारतानं तीनही मालिका जिंकून 360 गुण खात्यात जमा केले आहेत.
रविवारी दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियानं दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं एका डावात कुटलेल्या 580 धावा पाकिस्तानला दोन्ही डावांत मिळूनही करता आल्या नाही. बाबर आझमचे शतक आणि मोहम्मद रिझवानच्या 95 धावांच्या खेळीनंतरही पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 116 गुण आहेत. अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांना प्रत्येकी 56 गुणांवर समाधान मानावे लागले होते. ती मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकाही 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात 60 गुण होते. बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांना अजून खाते उघडता आलेले नाही.