मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याचा खेळाचा आलेख जसा सतत उंचावत जातो, तसाच त्याचा आर्थिक आलेखही सतत उंचावत आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार असलेला विराट कोहली आता अशाच एका आर्थिक गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. (Virat Kohli Salary News) एकीकडे आयपीएलचा धमाका सुरु असताना, दुसरीकडे बीसीसीआयने गुरुवारी आपल्या खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारी वार्षिक रक्कम पाहून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींचे डोळे विस्फारले. दखल घेण्याची बाब म्हणजे, एकट्या विराट कोहलीचे वेतन हे संपूर्ण पाकिस्तान संघाच्या वार्षिक वेतनाइतके असल्याचे यावेळी दिसून आले. (Virat Kohli alone gets the same salary as the annual Salary of the entire Pakistan team)
बीसीसीआयने नुकताच जाहीर केलेल्या केंद्रीय करारामध्ये विराट, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना ‘ए प्लस’ गटामध्ये ठेवले आहे. या करारानुसार या तिन्ही स्टार खेळाडूंना प्रत्येकी ७ कोटी रुपये वार्षिक वेतन मिळणार. बीसीसीआयच्या वेतन करारामध्ये ए प्ल, ए, बी आणि सी असे चार गट असतात. यामध्ये अनुक्रमे ७ कोटी, ५ कोटी, ३ कोटी आणि एक कोटी असे वार्षिक वेतन दिले जाते.
मैदानासोबतच, जाहिरातींच्या मार्केटमध्येही कोहलीचा चांगलाच बोलबाला आहे. येथूनही त्याची बक्कळ कमाई सुरु असते. मात्र, त्याच्या एकूण कमाईतून जाहिरातीतून मिळणारा पैसा जरी वेगळा केला, तरी त्याची कमाई ही जवळपास संपूर्ण पाकिस्तान संघाच्या वार्षिक कमाई इतका आहे. एकीकडे बीसीसीआयच्या करारामध्ये चार गटवारी असताना पाकिस्तानच्या करारामध्ये तीन गटवारी आहे. यातील सर्वोच्च ए गटामध्ये अव्वल तीन खेळाडूंना ११ लाख पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ५.२० लाख रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात. या गटात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि अजहर अली यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, बी गटाला ७.५० लाख पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात ३.५४ लाख रुपये) आणि सी गटाला ५.५० लाख पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात २.६० लाख रुपये) दर महिन्याला मिळतात. पाकिस्तानने ए गटात ३, बी गटात ९ आणि सी गटात ६ खेळाडूंना ठेवले आहे.
भारतीय चलनानुसार पाकिस्तानी रुपयाचे मूल्यांकन केल्यास संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघाचे वार्षिक वेतन हे जवळपास एकट्या विराट कोहलीच्या वार्षिक वेतना इतके असल्याचे दिसून येईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दरवर्षी आपल्या खेळाडूंच्या वेतनावर ७.४ कोटी रुपये खर्च करते.
Web Title: Virat Kohli alone gets the same salary as the annual Salary of the entire Pakistan team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.