क्रिकेटमध्ये विराट कोहली, तर फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो.... आपापल्या खेळातील हे दिग्गज मँचेस्टर कसोटीच्या पाचव्या दिवशी एकमेकांना भेटणार आहे. १० सप्टेंबरपासून इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना सुरू होणार आहे. भारतानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि १४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची आयती संधी टीम इंडियाकडे आहे. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे रोनाल्डो व कोहली यांची भेट.
ख्रिस्तियानो रोनाल्डोनं युव्हेंटस क्लब सोडून पुन्हा मँचेस्टर युनायटेडसोबत करार केला. २००९नंतर रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल झाला आहे. त्यामुळे इंग्लिश प्रीमिअर लीगचे फॅन्स आनंदात आहेत. भारताचा पाचवा कसोटी सामनाही मँचेस्टर येथेच सुरू आहे. त्यामुळे स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार कसोटीच्या पाचव्या दिवशी रोनाल्डो व कोहली एकमेकांना भेटणार आहेत.
रोनाल्डो व कोहली यांचे इंस्टाग्रामवर असंख्य चाहते आहेत आणि या दोघांची भेट म्हणजे सोशल मीडियावर धुमाकूळच असणार आहे. कोहलीचे नुकतेच इंस्टाग्रामवर १५० मिलियन म्हणजेच १५ कोटी ०१ लाख १६,१४६ इतके फॉलोअर्स झाले आहेत. संपूर्ण आशियात इतके फॉलोअर्स असलेला विराट हा पहिलाच सेलिब्रिटी आहे. जगभरात १५० मिलियन इंस्टा फॉलोअर्स असलेला तो चौथा खेळाडू ठरला आहे. पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( ३३७ मिलियन), अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी ( २६० मिलियन) आणि ब्राझिलचा नेयमार ( १६० मिलियन) हे आघाडीवर आहेत.
वाढते फॉलोअर्स ही विराट कोहलीसाठी चांगली गोष्ट आहे. Hopper HQनं दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या देशातील सेलिब्रिटींमध्ये विराट अव्वल स्थानावर आहे. इंस्टाग्रामवर एका स्पॉन्सर्ड पोस्टमागे तो ५ कोटी रुपये कमावतो. आता फॉलोअर्सचा आकडा वाडल्यानं त्याच्या मिळकतीतही वाढ होणार आहे. रोनाल्डो एका इंस्टा पोस्टमागे ११.७२ कोटी, मेस्सी ८.५४ कोटी आणि नेयमार ६ कोटी कमावतो.
यापूर्वी रोनाल्डो व कोहलीनं एकमेकांशी ट्विटवरून संवाद साधला होता.