नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज विराट कोहली आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन हे पोर्तुगालचा महान फुटबॉलरख्रिस्तियानो रोनाल्डोच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. मागील महिन्यात प्रशिक्षक टेन हाग यांच्याशी झालेल्या वादानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला आहे. फिफा विश्वचषकाच्या थरार रंगला असतानाच रोनाल्डोने हा निर्णय घेतला.
मुलाखतीदरम्यान, रोनाल्डोने 'रेड डेव्हिल्स' बॉसने आपल्याशी केलेल्या वाईट वागणुकीबद्दल भाष्य केले आणि क्लबने आपला विश्वासघात केल्याचे देखील सांगितले. सध्या कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2022 साठी पोर्तुगालच्या संघासोबत जोडण्याआधीच रोनाल्डोने ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनला ही मुलाखत दिली होती.
पीटरसनने दिला पाठिंबाकेव्हिन पीटरसनच्या म्हणण्यानुसार, मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोच्या वैयक्तिक तक्रारी समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही आणि त्याला क्लब सोडू दिला नाही. पीटरसनने स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाचे होस्ट पियर्स मॉर्गन यांच्या बोलताना सांगितले की, "क्लबने त्याचे ऐकले नाही आणि त्याला क्लबमधून बाहेर काढण्यात आले हे रोनाल्डोचे विधान खरे असेल तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्याच्या कुटुंबासोबत काय चालले आहे याची क्लबला कल्पना देखील नाही." याशिवाय रोनाल्डो हा एक प्रसिद्ध खेळाडू असून त्याने जे काही मिळवले आहे ते कष्टाने मिळवले असल्याचे पीटरसनने अधिक सांगितले.
केव्हिन पीटरसनने ही मुलाखत त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय दिग्गज विराट कोहलीने देखील या पोस्टला लाईक केले आहे. खरं तर किंग कोहली स्वतः देखील रोनाल्डोचा मोठा चाहता आहे आणि तो त्याला आपला आदर्श मानतो. 22 नोव्हेंबर रोजी मँचेस्टर युनायटेडने अधिकृतपणे माहिती दिली की, क्रिस्टियानो रोनाल्डोने 'म्युच्युअल कराराने' क्लब सोडला आहे आणि पोर्तुगालच्या विश्वचषक मोहिमेनंतर 'थिएटर ऑफ ड्रीम्स' मध्ये परत येणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"