LSG vs RCB, virat kohli and naveen ul haq । मुंबई : आयपीएलमध्ये काल झालेला सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यजमान लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्याच घरात पराभव केला. पण खेळ भावनेला ठेच पोहचवणाऱ्या काही घडामोडी कालच्या सामन्यात झाल्या. त्यामुळे या सामन्याने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. विराट कोहली आणि नवीन-उल-हक नंतर कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
या वादानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यावर बीसीसीआयने कारवाई करताना एका सामन्याच्या १०० टक्के मानधनाचा दंड आकारला. तर नवीन उल हकला ५० टक्के मॅच फीचा दंड आकारला गेला. अशातच विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवून पहिली प्रतिक्रिया दिली. विराटने रोमनचे सम्राट Marcus Aurelius यांच्या काही चारोळ्या पोस्ट करत म्हटले, "आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो तो एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही."
कोहलीपाठोपाठ अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हकने देखील स्टोरी ठेवून प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतेच आणि हो हे असेच झाले पाहिजे. गोष्टी अशाच चालत राहिल्या पाहिजेत", अशा शब्दांत नवीनने कालच्या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
RCBचा शानदार विजय नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिस (४४) आणि विराट कोहली (३१) वगळता कोणत्याच आरसीबीच्या फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. निर्धारित २० षटकांत आरसीबीचा संघ ९ बाद १२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौच्या फलंदाजांची देखील वाईट अवस्था झाली. कृष्णप्पा गौतम (२३) वगळता एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे लखनौच्या संघाची डोकेदुखी वाढली. अखेर लखनौचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १९. ५ षटकांत १०८ धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवून लखनौला पराभवाची धूळ चारली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"