यंदाच्या वर्षातील अविस्मरणीय क्षणाची निवड करायची झाल्यास तर तो वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना असेल... इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्याची चुरस सर्वांनाच खिळवून ठेवणारी आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्ससाठी हे वर्ष यादगार राहिले आहे. टीम इंडियासाठीही हे वर्ष खास राहिले. मागील दहा दशकांतील खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर विस्डननं दशकातील सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे.
विस्डनच्या या संघात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा दबदबा दिसत आहे. इंग्लंड आणि आफ्रिकेचे प्रत्येकी तीन खेळाडू या संगात आहे. त्यापाठोपाठ भारत आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन आणि श्रीलंकेच्या एका खेळाडूनं स्थान पटकावले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विन यांनी या संघात स्थान पटकावले आहे. या संघाचे नेतृत्व विराटकडे सोपवण्यात आले आहे. या दशकात अश्विननं 70 सामन्यांत 362 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कुक आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर यांच्याकडे सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णदार कुमार संगकाराला यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून निवडले आहे. त्याच्यासह कोहली आणि स्टीव्ह स्मिथ मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनेही या संघात स्थान पटकावले आहे. बेन स्टोक्स हा एकमेव अष्टपैलू या संघात आहे, तर अश्विन हा एकमेव फिरकीपटू आहे. डेल स्टेन, कागिसो रबाडा आणि जेम्स अँडरसन हे जलद माऱ्याची जबाबदारी पार पाडतील.
संघ - अॅलेस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, कुमार संगकारा, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, बेन स्टोक्स, एबी डिव्हिलियर्स, आर अश्विन, डेल स्टेन, कागिसो रबाडा, जेम्स अँडरसन.
Web Title: Virat Kohli and Ravichandran Ashwin only Indians in Wisden's Test Team of the Decade
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.