Virat Kohli And RCB Teammates । हैदराबाद : आयपीएलचा सोळावा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत असून गतविजेत्या गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. आयपीएलचा पहिला किताब जिंकण्याच्या इराद्याने मैदानात असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १२ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. खरं तर 'जर तर'च्या गणितावर आरसीबीची पुढील वाटचाल ठरणार आहे.
दरम्यान, प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या आरसीबीच्या शिलेदारांनी संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराजच्या नवीन घराला भेट दिली. सिराजच्या हैदराबाद येथील घरी आरसीबीच्या खेळाडूंनी हजेरी लावल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
"पुढे जाऊन पुढच्या पिढीचे नेतृत्व कर...", 'शतकवीर' शुबमन गिलचे 'विराट' कौतुक
हैदराबादविरूद्ध आरसीबीची 'अग्निपरीक्षा'फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा आगामी सामना सनरायझर्स हैदराबादसोबत होणार आहे. हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला आहे. पण आरसीबीसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हैदराबादविरूद्धचा विजय आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवेल. तर आरसीबीला नमवून हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत रंगत आणणार का हे पाहण्याजोगे असेल.
गतविजेत्यांची प्लेऑफमध्ये धडककाल सनरायझर्स हैदराबादला नमवून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर (१०१) निर्धारित २० षटकांत ९ बाद १८८ धावा केल्या. १८९ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांना घाम फुटला अन् संघ केवळ १५४ धावा करू शकला. गतविजेत्यांनी ३४ धावांनी मोठा विजय मिळवून प्लेऑफमध्ये धडक मारली.