Join us

किंग कोहलीसह रिषभ पंत दिल्लीच्या रणजी संघात; जोडी 'गंभीर' सल्ला खरंच मनावर घेणार?

 स्टारडम लाभलेली ही जोडगोळी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे संकेत मिळत आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:48 IST

Open in App

Ranji Trophy Virat Kohli Rishabh Pant: भारतीय क्रिकेट संघाला घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिकेतील पराभवाची भर पडली अन् स्टार फलंदाज निशाण्यावर आले. रोहित शर्मासह विराट कोहली देशांतर्गत क्रिकेट का खेळत नाहीत? असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गंभीरचा सल्ला मनावर घेतला, विराटसह रिषभ पंत रणजी स्पर्धेत खेळण्याचे संकेत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर कोच गंभीर यानेही संघातील खेळाडूंना रेड बॉल क्रिकेटमध्ये टिकायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळा, असा सल्ला दिला. हा सल्ला विराट कोहलीसहरिषभ पंतनही मनावर घेतल्या दिसते. रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी दिल्लीच्या संभाव्य संघात विराट कोहलीसह पंतच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्टारडम लाभलेली ही जोडगोळी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे संकेत मिळत आहेत.     किंग कोहलीनं मुंबईकरांकडून प्रेरणा घ्यावी 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार,  दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने ऋषभ पंत आणि विराट कोहली यांच्या नावाचा रणजी स्पर्धेतील संभाव्य खेळाडूंच्या यादीत समावेश केला आहे. डीडीसीए सचिव अशोक शर्मा म्हणाले आहेत की, ''विराट कोहलीनं मुंबईच्या क्रिकेटर्सकडून प्रेरणा घ्यावी. वेळ मिळेल त्यावेळी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला पाहिजे.  मुंबईमध्ये एक संस्कृती पाहायला मिळते. भारतीय संघातील क्रिकेटरही मोकळ्या वेळेत देशांतर्गत क्रिकेट खेळण्याला पसंती देतात." असा उल्लेख DDCA सचिवांनी केलाय. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोहलीची निराशजनक कामगिरी

कोहलीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतक झळकावले. पण ही कामगिरी वगळता त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. विराट सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १७ धावा तर दुसऱ्या डावात ६ धावांवर बाद झाला होता.  मेलबर्न कसोटीत त्याने अनुक्रमे ३६ आणि ५ धावा केल्या.  ब्रिसबेन कसोटीत त्याने फक्त ३ धावा काढल्या. अ‍ॅडिलेड कसोटी सामन्यात त्याने ७ आणि ११ धावांची खेळी केली होती. ऑफ स्टंपच्या  बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो सातत्याने फसला. 

वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर

भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत नाही. यात विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि अन्य काही स्टारडम मिळालेल्या खेळाडूंचा समावेश आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर बीसीसीआयने या खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सक्ती केल्याचे बोलले जाते. त्यामुळे विराट कोहलीसह अन्य सुपरस्टार रणजीच्या मैदानात उतरतील, असे चित्र निर्माण झाले आहे. याआधीही विराट कोहलीच नाव रणजी संघात आले होते. पण तो मैदानात काही उतरला नाही. त्यामुळेच यावेळी तरी तो 'गंभीर' सल्ला मनावर घेणार का? हा प्रश्न उपस्थितीत होतो. त्याच उत्तर लवकरच मिळेल. २३ जानेवारीला दिल्लीचा संघ सौराष्ट्र विरुद्ध रणजी स्पर्धेतील सामना खेळणार आहे. या दिवशी कोहली-पंत दिल्लीकडून मैदानात उतरणार की, नाही ते स्पष्ट होईल. 

टॅग्स :विराट कोहलीरणजी करंडकरिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ