भारताचे दोन संघ सध्या एकाच वेळी दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि तेथे यजमान इंग्लंडविरुद्ध ते पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि तेथे तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियातील सर्व वरिष्ठ खेळाडू आहेत, तर श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीतील युवा खेळाडू गेले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची ही मर्यादित षटकांची अखेरची मालिका आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर दमदार कामगिरी करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी निवडण्यात येणाऱ्या संघात स्थान मिळवण्यासाठी युवा खेळाडूंसाठी ही शेवटची संधी आहे. पण, याच मालिकेमुळे विराट कोहली व रोहित शर्मा यांना मोठा धक्का बसणार आहे...
शिखर धवन, पृथ्वी शॉ हे दोघं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या सलामीवीराच्या दुसऱ्या पर्यायासाठी शर्यतीत आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या दोघांच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा असणार आहे. रविवारपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. त्यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि १४ सप्टेंबरनंतर खेळाडू थेट आयपीएलसाठी यूएईत दाखल होतील. त्यानंतर तेथेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.
पाकिस्तानच्या बाबर आजमला फायदा!या मालिकेनंतर आयसीसी वन डे क्रमवारीत मोठे फेरबदलही पाहायला मिळतील. त्यात विराट व रोहितला मोठा धक्का बसण्याचा अंदाज आहे. विराट व रोहित श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळणार नसल्यानं त्यांचे गुण कमी होण्याचा अंदाज आहे. सध्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ८७३ गुणांसह अव्वल स्थानी आहे. विराट कोहली ८५७ व रोहित शर्मा ८२५ गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण, भारत-श्रीलंका मालिकेनंतर विराट व रोहित यांच्या खात्यातील अनुक्रमे १३ व १२ गुण कमी होतील. त्यामुळे बाबर आजम व विराट कोहली यांच्या गुणांतील तफावत आणखी वाढेल. ( Virat Kohli and Rohit Sharma are likely to lose 13 and 12 points respectively from their ODI Rating due to Sri Lankan series)