IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेत विजयी सलामी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात होती. पण, यजमान संघाने मोठा विजय मिळवत पाहुण्या भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. खरं तर या सामन्यातून नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिल्याने बीसीसीआयवर ताशेरे ओढले जात आहेत. अशातच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीम इंडियाची पुढची रणनीती स्पष्ट करताना विराट-रोहितला विश्रांती देण्याचे कारण सांगितले आहे.
"आशिया चषकापूर्वी संघ व्यवस्थापनाला काही खेळाडूंवर निर्णय घ्यायचे आहेत. म्हणूनच विराट आणि रोहित यांना विश्रांती देऊन नव्या चेहऱ्यांना खेळवले गेले. NCA मध्ये उपचार घेत असलेले काही प्रमुख खेळाडू दुखापतीतून बाहेर पडत आहेत आणि ते कधी मैदानात परततील याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत, आम्ही नवीन चेहऱ्यांना आजमावून पाहत आहोत", असे द्रविड यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला या सामन्यात ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.
द्रविडने सांगितली 'पुढची' रणनीतीसामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना द्रविड यांनी म्हटले, "आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावत होतो. आम्हाला त्या चेहऱ्यांना संधी द्यायची होती, जेणेकरून सर्वात वाईट परिस्थितीतही ते आपली चांगली कामगिरी करू शकतील. यामुळे आम्हाला काही खेळाडूंसाठी निर्णय घेण्याची संधी मिळते. आशिया चषकापूर्वी आमच्याकडे या प्रकारचे अर्थात वन डे सामने केवळ २-३ आहेत."
तसेच प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, तुम्हाला माहित आहे की विराट आणि रोहित खेळल्याने आगामी काळात येणाऱ्या प्रश्नांची आम्हाला जास्त उत्तरे मिळणार नाहीत. परंतु, सर्वांनाच कल्पना आहे की, अनेक जखमी खेळाडू एनसीएमध्ये आहेत आणि त्यांच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आम्हाला आणखी काही खेळाडूंना संधी द्यायची आहे. जेणेकरून गरज पडल्यास ते खेळू शकतील, असे द्रविड यांनी आणखी सांगितले.