दुबई - विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दिग्गज फलंदाजांना वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या यादीमध्ये विराट कोहलीला ८ गुणांचे तर रोहित शर्माला १२ गुणांचे नुकसान सहन करावे लागले आहे. सध्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा अव्वस्थानी आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला ०-३ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या क्विंटन डी कॉक आमि रासी वॅन डर डुसेन यांना फायदा झाला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दरम्यान, आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या नव्या क्रमवारीनुसार बाबर आझम हा ८७३ गुणांसह अव्वलस्थानी आहे. विराट कोहलीला ८ गुणांचे नुकसान झाले असले तरी विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर रोहि शर्मा पूर्वीप्रमाणेच तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा आणि न्यूझीलंडलचा रॉस टेलर या दोघांचेही प्रत्येकी ८०१ गुण आहेत.
तर भारताविरुद्धच्या मालिकेतील जबदरस्त कामगिरीमुळे रासी वॅन डर डुसेनला १० गुणांचा फायदा झाला आहे. त्याने भारताविरुद्धच्या मालिकेत २१८ धावा फटकावल्या होत्या. त्यात एका शतकाचाही समावेश होता. तर क्विंटन डी कॉकने एका शतकाच्या मदतीने २२९ धावा कुटल्या. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांची झेप घेत पाचवे स्थान पटकावले आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्माचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही भारतीय फलंदाजाला टॉप-१० मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच सहाव्या, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो सातव्या, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आठव्या आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन नवव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांचा विचार केल्यास भारताकडून केवळ जसप्रित बुमराह टॉप-१० गोलंदाजांमध्ये आहे. ६८९ गुणांसह त्याने सातवे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ७३७ गुणांसह अव्वलस्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा जोस हेझलवूड दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा ख्रिस व्होक्स तिसऱ्या स्थानी आहे. अफगाणिस्थानचा मुजीब उर रहमान चौथ्या तर बांगलादेशचा मेहदी हसन पाचव्या स्थानी आहे.
Web Title: Virat Kohli and Rohit Sharma hit hard before ODI series, big loss in ODI batsmen's rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.