ICC T20 World Cup 2024 - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेवून आहे, कारण आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड IPL 2024 च्या कामगिरीवर केली जाणार आहे. पण, विराट कोहलीला टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळणार की नाही, हा प्रश्न सर्वांनाच सतावतोय. याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
मागील आठवड्यात मुंबईत बीसीसीआयची एक महत्त्वाची बैठक झाली ज्यामध्ये रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. विराट कोहलीने ( Virat Kohli) वर्ल्ड कप संघातील त्याच्या स्थानाबाबत बोर्डाकडून स्पष्टीकरण मागितल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, जर कोहली टीम इंडियामध्ये खेळला, तर त्याला रोहितसोबत सलामीला यावे लागेल.
२०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विराट ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये भारताकडून खेळला नव्हता. पण, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून त्याने पुनरागमन केले. तेव्हा तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता आणि रोहित व यशस्वी जैस्वाल हे सलामीला खेळले होते. पण, आता विराट-रोहित ही जोडी पुन्हा सलामीला दिसेल. अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले की, ते विराटला कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियातून वगळू शकत नाहीत आणि तो रोहितसोबत सलामीला खेळू शकतात.
कोहलीने आयपीएल २०२४मध्ये ७ सामन्यांत सर्वाधिक ३६१ धावा केल्या आहेत. जर विराट कोहली ट्वेंटी-२०वर्ल्ड कपमध्ये रोहितसोबत ओपनिंगला आल्यास यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यापैकी एकाची तिसऱ्या क्रमांकावर निवड होईल. आयपीएलमध्ये सध्याचा फॉर्म पाहाता शुबमनला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. फ्लॉप ठरलेला यशस्वीला बाकावर बसवले जाऊ शकते.