नवी दिल्ली-
विराट कोहलीनं भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्मा याच्याकडेच कसोटी संघाचंही नेतृत्त्व सोपवलं जाण्याची दाट शक्यता आहे. यात केएल राहुलचंही नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. ३४ वर्षीय रोहित शर्माची याआधीच भारतीय ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघाचं कर्णधारपदासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे एक उत्तम फलंदाज म्हणून संघासाठी कशी चांगली कामगिरी करता येईल याचं आव्हान आता विराट कोहलीसमोर आहे. कारण कोहली आता मैदानात कर्णधार नव्हे, तर संघाचा खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे.
भारतीय संघाचे माजी निवड समिती सदस्य सबा करीम यांच्या मतानुसार विराट कोहलीला आता अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे आणि सध्याच्या संघ नेतृत्त्वासोबत संपूर्ण संघाशी जुळवून घ्यावं लागणार आहे. यात रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे. खराब फॉर्मचा विराट कोहलीला पश्चाताप होत आहे याची कल्पना आहे. पण मला विश्वास आहे की तो पुनरागमन करेल. कारण अशा परिस्थितीवर मात करण्याचा अनुभव आणि क्षमता असं दोन्ही कोहलीकडे आहे, असं सबा करीम म्हणाले.
रोहित आणि कोहली यांच्यातील वादावर म्हणाले...
सबा करीम यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील वादाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. भारतीय संघाच्या द.आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी विराट कोहलीनं रोहित शर्मासोबतच्या वादाच्या वृत्तांचं स्पष्टपणे खंडन केलं होतं. सबा करीम यांच्या मते आता रोहित शर्माला संघाचा कर्णधार या नात्यानं या मुद्द्यावर एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला सोबत घेऊन संघातील खेळाडूंशी बोलावं लागणार आहे. संघात कशापद्धतीचं वातावरण आणि संस्कृती अपेक्षित आहे याबाबत रोहित आणि राहुल द्रविड यांनी कोहलीसह संपूर्ण संघातील खेळाडूंसमोर आपली भूमिका मांडावी लागेल. यासाठी रोहित शर्मा विराट कोहलीला सल्ला देखील घेऊ शकतो, असं सबा करीम म्हणाले.
रोहित आणि कोहलीनं व्यापक दृष्टीनं व अंतिम ध्येयाचा विचार करण्याची गरज आहे. जर दोघंही एकाच विचारसरणीतून पुढे जात असतील तर चांगलंच आहे. पण दोघांमध्ये काही वाद झाले तर ड्रेसिंग रुममधलं वातावरण लवकरच खराब होईळ. त्यामुळे दोघांनी एकत्र काम करणं खूप गरजेचं आहे, असं सबा करीम म्हणाले.
Web Title: virat kohli and rohit sharma the dressing room environment will go down quickly said former indian selector saba karim
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.