आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय मिळवून विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. मात्र भारतीय संघ विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याने भारतीय क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. तसेच हे दोन्ही दिग्गज फलंदाज आता आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत पुन्हा खेळताना दिसणार का? अशी विचारणा क्रिकेटप्रेमींकडून होत आहे. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली हे पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील, अशी माहिती जय शाह यांनी दिली आहे.
उपांत्य फेरीत रोहित शर्मा आणि अंतिम लढतीत विराट कोहली यांनी केलेल्या खेळींमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालणं शक्य झालं होतं. या खेळींमुळे २००७ नंतर तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद मिळालं. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे क्रिकेटप्रेमी निराश झाले होते. मात्र सात महिन्यांमध्येच भारतीय संघानं टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावत या अपयशाची भरपाई केली आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात वरिष्ठ खेळाडू असतील. जय शाह यांच्या या विधानामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळतील, हे निश्चित झाले आहे. जय शाह पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे भारतीय संघ वाटचाल करत आहे. ते पाहता आमचं पुढचं लक्ष्य कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकणं हे आहे. या स्पर्धांमध्ये जवळपास तोच संघ सहभागी होईल, जो सध्या खेळत आहे. तसेच त्यामध्ये वरिष्ठ खेळाडूंचाही समावेश असेल.
Web Title: Virat Kohli and Rohit Sharma to play in ICC Champions Trophy? Jai Shah made a big announcement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.