रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे अनुभवी फलंदाज. भारतीय संघाचे आधारस्तंभ. किंग कोहलीची दुसरी ओळख 'रन मशीन' अशीही आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मात्र विराटची बॅट तिनही सामन्यांत शांत होती. हाच का तो तडाखेबंद फटके मारणारा विराट, असा चाहत्यांनाही प्रश्न पडला. विराटला बाद करण्याची क्लृप्ती न्यूझीलंडने अलगद शोधली आणि भारताच्या पराभवाला सुरुवात झाली. विराटने तीन सामन्यांतील सहा डावांत केवळ ९६ धावा केल्या.
कर्णधार रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. स्थानिक चाहत्यांपुढे नयनरम्य फटके मारणाऱ्या रोहितवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अंकुश लावला. आत येणाऱ्या चेंडूवर, तसेच उसळी घेतल्यानंतर अनाकलनीय अशा चेंडूवर तो बाद होत गेला. सलामीवीर म्हणून योग्य पायाभरणी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहितचे अपयश संघाच्या पराभवास कारणीभूत ठरले. अन्य फलंदाजांच्या तुलनेत विराट-रोहितकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असताना आपल्या ओळखीच्या खेळपट्ट्यांवर दोघांनी नांगी टाकताच भारताला २४ वर्षांनंतर नामुष्कीचा मालिका पराभव पत्करण्याची वेळ आली. रोहितने तीन सामन्यांत ९१ धावा केल्या.
रोहित, विराट यांची ऑस्ट्रेलियात अखेरची कसोटी मालिका
- बीसीसीआय न्यूझीलंडकडून झालेल्या ०-३ अशा व्हाइटवॉशवर मंथन करणार आहे. पराभवानंतर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंचे भविष्य निश्चित केले जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कारकिर्दीत अखेरची मालिका खेळतील, हे नक्की.
- पुढील डब्ल्यूटीसी सायकल सुरू होण्यापूर्वी पुढचे धोरण निश्चित करताना या धक्कादायक पराभवाचेदेखील मूल्यमापण होणार आहे.
- रोहितसह विराट, जडेजा आणि अश्विन हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. चार ज्येष्ठ खेळाडूंपैकी किमान दोन खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका अखेरची असेल. कर्णधार रोहितला याबाबत विचारताच, 'मी फार पुढचा विचार करीत नाही. आगामी मालिकेवर लक्ष केंद्रित करणार आहोत,' इतकेच त्याने सांगितले.
Web Title: Virat kohli and Rohit sharma's disappointing performance contributed to India's defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.