नवी दिल्ली : भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वन डे मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने पराभूत करून नवा इतिहास रचला आहे. रविवारी झालेला अखेरचा सामना भारतीय संघाने तब्बल 317 धावांनी आपल्या नावावर केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 390 धावा केल्या होत्या. विराट कोहली नाबाद (166) आणि शुबमन गिलच्या (116) धावांच्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभारला. 391 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या श्रीलंकेच्या संघाला पूर्णपणे अपयश आले. श्रीलंकेचा संघ संपूर्ण 50 षटके पण खेळू शकला नाही आणि 22 षटकांत केवळ 73 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, अविस्मरणीय विजयानंतर भारताच्या विजयाचे हिरो शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाच्या पडद्यामागील हिरोंचे आभार मानले आहेत. ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. शुबमन गिलने या पडद्यामागील हिरोंची ओळख सांगताना म्हटले, "सामना सुरू होण्याच्या आधी तयारी करण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या पडद्यामागील 3 हिरोंचे आम्ही आभार मानत आहोत." यानंतर किंग कोहलीने यांची ओळख पटवून दिली. "पहिला रघु तर दुसरा नुवान हा मूळचा श्रीलंकेचा आहे, पण तो आता पूर्णपणे भारतीय झाला आहे. याशिवाय दया हा एक भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. हे तिघेही आम्हाला वर्ल्ड क्लास सरावा करण्यासाठी खूप मदत करतात. त्यांच्यामुळेच माझ्या कारकिर्दीत काहीसे वेगळे झाले आहे. त्यामुळे तुमचे खूप आभार कारण तुमच्यामुळे मला आणि संघाला खूप मदत झाली आहे", अशा शब्दांत विराटने या तिघांचे आभार मानले.
किंग कोहलीचा नवा विक्रम विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म या मालिकेतही पाहायला मिळाला. तिसऱ्या सामन्यापूर्वी त्याने 267 वन डे सामन्यांमध्ये 12588 धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने 62 धावांचा आकडा गाठताच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे टाकले. विराटच्या या खेळीपूर्वी महेला जयवर्धने वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत 5व्या स्थानावर होता, मात्र आता विराटने हे स्थान गाठले आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिन तेंडुलकरच्या वनडेत एकूण 18426 धावा आहेत. यानंतर या यादीत श्रीलंकेच्या कुमार संगकाराचे नाव आहे. त्याने वन डे क्रिकेटमध्ये एकूण 14234 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रिकी पाँटिंगने वन डे क्रिकेटमध्ये 13704 धावा केल्या आहेत आणि सनथ जयसूर्याने 13430 धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Virat Kohli and Shubman Gill thank 3 heroes behind the scenes who played a vital role in India's victory in a video shared by BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.