नवी दिल्ली : भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वन डे मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने पराभूत करून नवा इतिहास रचला आहे. रविवारी झालेला अखेरचा सामना भारतीय संघाने तब्बल 317 धावांनी आपल्या नावावर केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 390 धावा केल्या होत्या. विराट कोहली नाबाद (166) आणि शुबमन गिलच्या (116) धावांच्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभारला. 391 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या श्रीलंकेच्या संघाला पूर्णपणे अपयश आले. श्रीलंकेचा संघ संपूर्ण 50 षटके पण खेळू शकला नाही आणि 22 षटकांत केवळ 73 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, अविस्मरणीय विजयानंतर भारताच्या विजयाचे हिरो शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाच्या पडद्यामागील हिरोंचे आभार मानले आहेत. ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. शुबमन गिलने या पडद्यामागील हिरोंची ओळख सांगताना म्हटले, "सामना सुरू होण्याच्या आधी तयारी करण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या पडद्यामागील 3 हिरोंचे आम्ही आभार मानत आहोत." यानंतर किंग कोहलीने यांची ओळख पटवून दिली. "पहिला रघु तर दुसरा नुवान हा मूळचा श्रीलंकेचा आहे, पण तो आता पूर्णपणे भारतीय झाला आहे. याशिवाय दया हा एक भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. हे तिघेही आम्हाला वर्ल्ड क्लास सरावा करण्यासाठी खूप मदत करतात. त्यांच्यामुळेच माझ्या कारकिर्दीत काहीसे वेगळे झाले आहे. त्यामुळे तुमचे खूप आभार कारण तुमच्यामुळे मला आणि संघाला खूप मदत झाली आहे", अशा शब्दांत विराटने या तिघांचे आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"