Virat Kohli Anil Kumble Controversy: भारतीय क्रिकेटमध्ये वादविवाद हा नवा प्रकार नाही. चाहत्यांनाही आता वादासंबंधीच्या वृत्तांची सवय झाली आहे. अशातच माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात नक्की कशावरून वाद झाला होता, यासंबंधीचे काही धक्कादायक खुलासे संघाचे माजी मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी त्यांच्या 'On Board: Test, Trial, Triumph' या पुस्तकात केले. विराटला अनिल कुंबळेंचा नक्की कोणत्या कारणावरून राग यायचा, याबद्दलही त्यांनी लिहिले आहे.
भारतीय संघ पाकिस्तानशी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत झाला. त्या पराभवानंतर अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. विराटशी कुंबळेंचा नक्की काय वाद झाला याबद्दल पुस्तकात खुलासा करण्यात आला. "विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद हा खूप दिवस आधीपासून सुरू होता. विराट कोहलीला असं वाटायचं की कुंबळे हे संघातील सहकाऱ्यांना सपोर्ट करत नाहीत. त्यांच्या वर्तणुकीमुळे ड्रेसिंग रूममध्ये तणावपूर्ण वातावरण असतं. त्यामुळे विराटला कुंबळेंचा खूप राग यायचा", असं पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
"अनिल कुंबळे यांना प्रशिक्षक म्हणून बरेच खेळाडू नापसंत करायचे. अनेकांना वाटायचं की कुंबळेंना प्रशिक्षक पदावरून हटवलं जायला हवं. २०१७ साली वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर IPL दरम्यान कुंबळेंना भेटले होते. त्यावेळी सेहवागने कुंबळेंना सांगितलं की डॉ. श्रीधर यांनी त्यांना कोच पदासाठी अर्ज द्यायला सांगितला आहे. त्यानंतर हैदराबादमध्ये अनिल कुंबळे, विराट कोहली यांची COA सोबत मिटिंग झाली. त्यावेळी विनोद राय यांनी प्रशिक्षक निवडीची पद्धत विचारली आणि पुन्हा प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं. हे ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला आणि आम्हाला समजलं की अनेकांना अनिल कुंबळे कोच पदी नको आहेत", असाही उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.