इंडियन प्रीमिअर लीगचे 14वे पर्व स्थगित झाल्यानंतर मुंबईतील घरात पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी एक चळवळ उभी केली. त्यांच्या या प्रयत्नांना बुधवारी मोठं यश आलं. विराट सदिच्छादूत असलेल्या MPL या फँटसी लीग अॅपनं 5 कोटींची मदत जाहीर केली. त्यामुळे 7 कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन विराट व अनुष्का यांनी सुरू केलेल्या या चळवळीतून आता 11 कोटी निधी गोळा झाला आहे. विराटनं सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी दिली.
''MPL Sports Foundation चे मी आभार मानू इच्छितो. आम्ही सुरू केलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी त्यांनी 5 कोटींची मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे आम्ही आमचे लक्ष्य 11 कोटींपर्यंत वाढवले आहे. अनुष्का आणि मी तुमचा पाठींबा पाहून भावूक झालो आहोत,''असे विराटनं ट्विट केलं.
विराट कोहलीचा आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हेही कोरोना लढ्यासाठी काम करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं तामीळनाडू सरकारला 450 ऑक्सिजन संच दिले, सनरायझर्स हैदराबादनं 30 कोटी, तर राजस्थान रॉयल्सनं 7.5 कोटींची मदत केली. शिवाय पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, शिखर धवन आदी खेळाडूंनीही हातभार लावला आहे.