Virat Kohli Anushka Sharma, IND vs AUS: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला टी-20 मालिकेतून ब्रेक मिळाला आहे. याचदरम्यान विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेशला पोहोचला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा स्वामी दयानंद गिरी आश्रमात पोहोचले. स्वामी दयानंद गिरी (Swami Dayanand Giri) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे आध्यात्मिक गुरु होते, असे सांगितले जाते.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून ब्रेक मिळाला आहे. विराट कोहली सध्या क्रिकेटमधून मिळालेल्या ब्रेकचा फायदा घेत आहे. कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेशला पोहोचला आहे. विराट-अनुष्का नुकतेच ऋषिकेश येथील स्वामी दयानंद गिरी आश्रमात पोहोचले. स्वामी दयानंद गिरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षक होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा धार्मिक विधींच्या संदर्भात येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. आज (३१ जानेवारी) हा धार्मिक विधी होण्याची शक्यता आहे.
कोहली गंगा आरतीमध्ये सहभागी!
११ सप्टेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांचे अध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरी यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हापासून हा आश्रम अधिक प्रसिद्ध झाला. यामुळे अनेक दिग्गज अध्यात्मासाठी येथे येतात. तशात आता विरुष्का (Virushka) त्यांची मुलगी वामिकासह येथे आले आहेत. आश्रमाचे जनसंपर्क अधिकारी गुणानंद रायल यांनी सांगितले की, ते येथे पोहोचले आणि ब्रह्मलिन दयानंद सरस्वती यांच्या समाधीचेही दर्शन घेतले. यासोबतच गंगा घाटावर साधू-पंडितांसह गंगा आरतीही करण्यात आली.
त्यांच्यासोबत त्यांचा योगा ट्रेनरही आश्रमात राहिल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी योगाभ्यास व पूजेनंतर विरुष्का आश्रमात सार्वजनिक धार्मिक विधी होणार असून भंडाराही आयोजित करण्यात येणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळीही ते आश्रमातच राहणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी ऑस्ट्रेलिया मालिकेतील भारताच्या चांगल्या कामगिरीसाठी विरुष्का माँ गंगा कडून आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी ऋषींच्या अध्यात्मिक नगरीत पोहोचले आहे.
विरूष्काने वृंदावनलाही दिली होती भेट
या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी विराट कोहलीने अनुष्का आणि मुलगी वामिकासह वृंदावनलाही भेट दिली होती. यादरम्यान तिघांनीही वृंदावनात श्री परमानंदजींचे आशीर्वाद घेतले होते. वृंदावनहून परतल्यानंतर कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. आता कोहली ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणार आहे. या मालिकेत कोहलीची महत्त्वाची भूमिका अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (कसोटी मालिकेचे वेळापत्रक):
- पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
- दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
- तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला
- चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद