मुंबई - विरुष्काला लग्नाच्या शुभेच्छा देताना भारतीय क्रिकेटर रोहित शर्माने अनुष्काला आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला होता. विराट कोहलीने रोहितच्या या सल्ल्यावर ट्विटरच्या माध्यमातून मजेशीर प्रतीक्रिया दिली आहे. रोहित शर्माने 12 डिसेंबरला विराट कोहली आणि अनुष्का शर्माला लग्नाच्या शुभेच्छा देताना ट्विट केलं होतं की, ' विराट मी तुला हजबंड हँडबुक देईन आणि अनुष्का तू आडनाव बदलू नकोस'. रोहितचेही आडनाव शर्मा असल्याने अनुष्कालाही शर्मा हे नाव बदलू नकोस असा सल्ला त्याने गंमतीत दिला होता.
अनुष्का शर्माने या ट्विटचं उत्तर दिलं होतं, पण विराट कोहलीने आत्ता हे ट्विट पाहिलं असावं. विराट कोहलीनेही रोहित शर्माला मिश्किल उत्तर देत डबल सेंच्युरी हॅण्डबूक शेअर करायला सांगितलं आहे. अनुष्का शर्माने दोन दिवसानंतर रोहितच्या ट्विटचं उत्तर दिलं होतं. 'हाहाहा धन्यवाद रोहित. जबरदस्त खेळीसाठी अभिनंदन'.
विराट कोहलीच्या अनुपस्थित कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणा-या रोहित शर्माने बुधवारी मोहालीत झालेल्या दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरोधात 208 धावांची नाबाद खेळी केली होती. तीन सामन्यांची ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली. आता दोन्ही संघात टी-20 मालिका होणार आहे. यावेळीही रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी पार पडणार आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. सध्या विराट आणि अनुष्का हनिमून साजरा करत आहेत. इकडे त्यांचे कुटुंबिय मात्र रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त आहेत. विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर आता जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचं रिसेप्शन कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला बॉलिवूड आणि क्रिकेटर्ससाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिसेप्शनला मोठमोठे सेलिब्रेटी आणि क्रिकेटर उपस्थित राहणार आहेत.
अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहली
अनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे. अनुष्काचं संपुर्ण कुटुंब विराट कोहलीला चांगल्या प्रकारे ओळखतं.
विरुष्का विकणार लग्नाचे फोटो
लग्नात फोटो काढण्यामागे विराट आणि अनुष्काचं एक खास कारण होतं. हे सर्व फोटो एका अमेरिकन मॅगजिनला विकण्यात येणार असून, मिळणारे पैसे दान म्हणून देण्यात येणार आहेत. विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लवकरच विरुष्काच्या लग्नाचे फोटो एका मॅगजिनच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत. हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध फॅशन मॅगजिन असणार आहे. विरुष्काच्या या निर्णयामुळे चाहते शुभेच्छांनंतर आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
Web Title: Virat Kohli ask Rohit Sharma to share his double century handbook
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.