Join us  

विराट-BCCI वादावर माजी क्रिकेटपटू म्हणाला, "हे तर आगीत तेल ओतण्याचंच काम"

विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात गेल्या महिन्याभरापासून कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 3:52 PM

Open in App

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने एक कठोर निर्णय घेत विराट कोहलीला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं. विराटच्या जागी ही जबाबदारी BCCI ने रोहित शर्मावर सोपवली. त्यानंतर काही काळ विराट विरूद्ध BCCI असा संघर्ष सुरू असल्याचे दिसले. विराटने स्वत:ची तर सौरव गांगुलीने BCCI ची बाजू मांडली. शुक्रवारी भारतीय संघाची आफ्रिका वन डे मालिकेसाठी घोषणा झाली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी गांगुलीच्या विधानांना दुजोरा दिला. मात्र, चेतन शर्मा यांच्या विधानांमुळे आगीत तेल ओतलं गेल्याची प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केली.

विराट कोहलीला कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर सौरव गांगुलीने दावा केला होता की सिलेक्टर्सनी विराटला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती पण विराटने ते ऐकलं नाही व कर्णधारपद सोडलं. त्यानंतर विराटने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत गांगुलीने केलेल्या दाव्याच्या विरोधात काही विधानं केली. पण चेतन शर्मा यांनी मात्र गांगुलीच्या दाव्यालाच दुजोरा दिला.

या साऱ्या प्रकरणावर आकाश चोप्राने मत व्यक्त केलं. "निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी जे काही विधान केलं, त्यामुळे विराट-बीसीसीआय वादात आगीत तेल ओतल्याचाच प्रकार घडलाय. चेतन शर्मा यांनी आपली बाजू सांगितली. पण विराट आणि बोर्ड यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता असं दिसत होतं. चेतन शर्मांच्या विधानामुळे आता या वादात भरच पडली आहे", असं आकाश चोप्रा म्हणाला.

काल जाहीर झालेल्या संघात विराट कोहलीचा समावेश असला तरी तो आता संघाचा कर्णधार नाही. संघ जाहीर झाल्यानंतर विराटच्या नावाच्या पुढे C म्हणजेच कर्णधार असं अक्षर बघण्याची सवय आहे. यंदा मात्र तसं झालेलं नाही. नवीन सवय व्हायला वेळ लागले, असंही आकाश चोप्राने ट्वीट केलं.

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयसौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App