मुंबई - काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी-२० संघाची कप्तानी सोडणाऱ्या विराट कोहलीला जोराचा धक्का देत बीसीसीआयने त्याची वनडे कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. तसेच त्याच्या जागी रोहित शर्माची नियुक्ती केली आहे. अचानक घडलेल्या या घटनाक्रमामुळे भारतीय क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यामागचा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. बीसीसीआयने विराट कोहलीला स्वेच्छेने कर्णधारपदावरून बाजूला होण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र बीसीसीआयचा हा आदेश विराटने धुडकावून लावला होता. त्यानंतर बीसीसीआयने ४९ व्या तासाला विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी करत त्याजागी रोहित शर्माची नियुक्ती केली.
विराट कोहलीचा काळ संपुष्टात आला आहे, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न बीसीसीआयने केला. मात्र विराटकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बीसीसीआयने त्याला आपली ताकद दाखवून दिली. मात्र विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्याच्या निर्णयाचा बीसीसीआयने आपल्या पत्रकात उल्लेखही केला नाही. केवळ निवड समितीने पुढे जाण्याचा निर्णय घेत रोहित शर्माला वनडे आणि टी-२० क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय संघांचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२३ च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्याची विराट कोहलीची महत्त्वाकांक्षा होती, मात्र बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने त्याला कर्णधारपदावरून हटवले. ज्यावेळी भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतून जेव्हा बाहेर पडला तेव्हाचा विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवणे निश्चित झाले होते. बीसीसीआय त्याला कर्णधारपदावरून बाजूला होण्यासाठी सन्मानजनक मार्ग देऊ इच्छित होती. मात्र अखेरीस विराटने मला कर्णधारपदावरून हटवून दाखवाच, अशी भूमिका घेतली. त्यानंतर बीसीसीआयनेही त्याला आपली ताकद दाखवत त्याला कर्णधारपदावरून नारळ दिला. त्यामुळे हा निर्णय स्वीकारण्यावाचून विराट कोहलीकडे काही पर्याय उरला नाही.
धोनीकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच विराट कोहलीने भारतीय संघाचा दबदबा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्माण केला होता. मात्र भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देणे त्याला शक्य झाले नव्हते. २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. मात्र अंतिम फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागला. तर २०१९ च्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. यावर्षी झालेल्या आयसीसी कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. तर नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाला सुपर १२ फेरीत बाद व्हावे लागले.