ॲडलेड : सध्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळवला जात आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने सुरूवातीचे दोन्हीही सामने जिंकून ४ गुणांसह उपांत्य फेरीकडे कूच केली आहे. मात्र आपल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव केला होता.
दरम्यान, भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने पहिल्या 3 सामन्यांमध्ये एकूण 156 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात किंग कोहली 8.2 षटकांपर्यंत 31 धावांवर नाबाद खेळत आहेत. विराटने आजच्या खेळीच्या जोरावर विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. मागील 8 वर्षांपासून एकही खेळाडू त्याचा हा विक्रम मोडू शकला नाही. परंतु यावर्षी किंग कोहलीने हा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीनेमहेला जयवर्धनेच्या 1016 धावांचा आकडा पार केला आहे.
किंग कोहलीने रचला इतिहास विराट कोहलीने सलामीच्या दोन्हीही सामन्यात अर्धशतकी खेळी करून महेला जयवर्धनेच्या विश्वविक्रमाकडे कूच केली होती, आज अखेर त्याने श्रीलंकेच्या दिग्गजाला मागे टाकले आहे. जयवर्धनेने 31 सामन्यांमध्ये 1016 धावा केल्या आहेत. विराट सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावांची खेळी केली होती तर नेदरलॅंड्सविरूद्धच्या सामन्यात किंग कोहलीने नाबाद 62 धावांची खेळी केली होती. आजच्या सामन्यात देखील कोहली शानदार लयनुसार खेळत आहे.
रोहित शर्मालाही विक्रम करण्याची संधीभारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील जुनी लय पकडली आहे. पाकिस्तानविरूद्ध स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहितने नेदरलॅंड्सविरूद्ध अर्धशतकी खेळी करून पुनरागमन केले. आताच्या घडीला विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट कोहली पहिल्या आणि रोहित शर्मा चौथ्या स्थानी विराजमान आहे. तर ख्रिस गेल 965 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माच्या नावावर ९०४ धावा आहेत. तो या यादीत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आगामी काळात हिटमॅन देखील नवा इतिहास रचणार का हे पाहण्याजोगे असेल. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा विराट कोहलीच्या 84 धावांनी आणि महेला जयवर्धने 110 धावांनी मागे आहे.