लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेट संघाची महत्त्वाची खेळाडू स्मृती मानधना या दोघांच्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दोघांंनाही यंदा‘विस्डेन क्रिकेटर आॅफ दी इयर’ या सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी असलेल्या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा उदयोन्मुख खेळाडू राशिद खान याला सलग दुसऱ्यांदा टी२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब बहाल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा कोहलीने विस्डेनचा हा प्रतिष्ठीत पुरस्कार पटकावला आहे.
कोहली आणि मानधना यांनी मागच्या आयसीसी पुरस्कारांमध्येदेखील अव्वलस्थान पटकविले होते. डिसेंबरमध्ये स्मृतीला आयसीसीची ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू’ आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू’ पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते. कोहलीने सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पुरस्कार जिंकले होते. विस्डेन क्रिकेटर्सतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड होण्याची कोहलीची ही तिसरी वेळ ठरली. कोहलीने तिन्ही प्रकारात एकूण २७३५ धावा ठोकल्या. कोहलीची निवड टॅमी ब्युमोंट, जोस बटलर, सॅम कुरेन आणि रोरी बर्न्स या विस्डेनच्या सर्वोत्कृष्ट पाच खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली. आॅस्ट्रेलियाचे महान खेळाडू सर डॉन ब्रॅडमन (दहावेळा) आणि इंग्लंडचे जॅक हॉब्स (आठवेळा) यांच्यापाठोपाठ सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार तीन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा जिंकणारा कोहली क्रिकेट इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू बनला. कोहलीने भारताच्या इंग्लंडकडून झालेल्या १-४ या मालिका पराभवात पाच कसोटीत पाच शतकांसह ५९३ धावा ठोकल्या. (वृत्तसंस्था)
अफगाणिस्तानच्या राशिदने टी२० आंतरराष्टÑीय सामन्यात २२ गडी बाद केले. याशिवाय आयपीएलमध्ये २१ गडी बाद केले होते. विस्डेन १८८९ पासून सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची यादी जाहीर करीत असून, क्रिकेटमधील हा अत्यंत प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. यंदाचे या पुरस्काराचे १५६ वे वर्ष आहे.
भारतीय महिला संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना ही यंदा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू बनली. स्मृतीने मागच्या वर्षी एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्टÑीय सामन्यात क्रमश: ६६९ आणि ६६२ धावा ठोकल्या. महिलांच्या सुपर लीगमध्ये तिने ४२१ धावांचे योगदान दिले. मानधनाचा हा पहिलाच विस्डेन पुरस्कार आहे.
Web Title: Virat Kohli becomes the third Indian to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.