नवी दिल्ली ।
भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर असून एकदिवसीय मालिका खेळत आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाने विजय मिळवला मात्र दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या खेळीबद्दल अनेकजण प्रश्न उपस्थित करत असतानाच बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेतून कोहलीला आणि बुमराहला वगळले आणि त्यांना विश्रांती देण्याचा मोठा निर्णय घेतला.
विराट कोहलीला आगामी विंडीजविरूद्धच्या मालिकेतून वगळल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. काहींनी बीसीसीआयच्या या निर्णयाला विरोध दर्शवला तर काहींनी याचे स्वागत केले आहे. भारतीय संघातील माजी दिग्गज खेळाडूंनी कोहलीला विश्रांती द्यायला हवी असं म्हटलं होतं. माजी क्रिकेटपटू कपिल देव, आशिष नेहरा यांनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले असून तो लवकरच जुन्या लयनुसार खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
विराट कोहली लवकरच फॉर्ममध्ये येईल - नेहराविराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला विश्रांती देणं गरजेचं असून तो लवकरच त्याच्या जुन्या लयनुसार खेळेल असं आशिष नेहराने म्हटलं. वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेनंतर विराट एका नव्या जोशात खेळताना पाहायला मिळेल. याशिवाय विंडीजविरूद्धच्या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय योग्य आहे. या मालिकेनंतर कोहली नक्कीच त्याच्या फॉर्ममध्ये परतेल असा विश्वास यावेळी नेहराने व्यक्त केला.
कोहलीचा फॉर्म पाहता त्याला विश्रांतीची गरज - कपिल देवभारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना विराटला विश्रांती देण्याची गरज असल्याचे म्हटले. "विराट कोहली एक महान खेळाडू आहे आणि त्याच्यासारखा खेळाडू बाहेर ठेवणे योग्य नाही. मात्र जर एखादा खेळाडू त्याच्या लयनुसार खेळी करत नसेल तर त्याला काही वेळ विश्रांती देण्याची गरज आहे. मला इतकचं वाटतं की जर कोण चांगले प्रदर्शन करत नसेल तर त्याला विश्रांती देऊन इतरांना संधी दिली पाहिजे." असं परखड मत कपिल देव यांनी व्यक्त केले.
सततच्या विश्रांतीमुळे विराटचा फॉर्म जातोय - सरनदीप सिंग
भारतीय संघ निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी कोहलीच्या खेळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "विश्रांतीचा खरा अर्थ काय असतो मला हेच अद्याप समजलं नाही. एखादा खेळाडू १०० धावा करत असेल तर त्याला साहजिकच आराम हवा पण कोहलीने मागील ३ महिन्यांपासून एकही साजेशी खेळी केली नाही. त्याला विश्रांतीचं स्वातंत्र्य मिळालं आहे पण त्याने जास्त धावा केल्या असत्या तर विश्रांती हवी आहे असं त्याने म्हटलं असतं. कोहलीने यावर्षी अनेक चुका केल्या आहेत सततच्या विश्रांतीमुळे त्याचा फॉर्म जात असून पुन्हा फॉर्ममध्ये येणे कठीण होणार आहे. कोहलीला सतत विश्रांती देणे संघासाठी आणि त्याच्यासाठी घातक होत चालले आहे. असं सरनदीप सिंग यांनी अधिक म्हटले.