नवी दिल्ली, दि. 16 - विराट कोहलीचजगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचं सांगत भारतीय महिला क्रिकेट संघाची गोलंदाज झुलन गोस्वामीने स्तुतीसुमनं उधळली आहेत. विराट कोहली एक अभूतपुर्व क्रिकेटर असल्याचं झुलन गोस्वामी बोलली आहे. 'विराट कोहली जगातील सर्वोत्तम क्रिकेटर आहे. ज्याप्रकारे तो खेळतोय आणि भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे ते जबरदस्त आहे', असं झुलन गोस्वामीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं आहे. झुलन गोस्वामी महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी खेळाडू आहे. झुलन गोस्वामीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 195 विकेट्स घेतल्या आहेत.
विराट कोहलीला एखादा सल्ला द्यायचा आहे का असं विचारलं असता झुलन गोस्वामीने सांगितलं की, 'त्याने आपला खेळ याच पद्धतीने पुढे सुरु ठेवावा'. यावेळी झुलन गोस्वामीने विराट कोहली ज्याप्रकारे आपल्या फिटनेसकडे लक्ष केंद्रीत करत आहे त्याचंही कौतुक केलं. 'फिटनेस हा खेळाचा महत्वाचा भाग असून महिला खेळाडूही जीममध्ये घाम गाळत असून डाएट फॉलो करत आहेत', असं तिने सांगितलं.
'आम्ही स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतो. रोज जीममध्येही जातो. आता क्रिकेट बदललं असून, एक पॉवरफून गेम झाला आहे. त्यामुळे तुमच्यात ताकद असणं गरजेचं आहे. एक चांगलं डाएट फॉलो करणं ही गरज आहे', असं झुलन गोस्वामीने सांगितलं.
यावेळी स्मृती मंधना आणि वेदा कृष्णमुर्तीदेखील उपस्थित होत्या. भारत - ऑस्ट्रेलिया सीरिजवर बोलताना स्मृती मंधनाने सांगितलं की, 'गेल्या चार ते सहा महिन्यांपासून भारतीय संघ जबरदस्त पद्धतीने खेळत आहे. त्यांना आमच्या सल्ल्याची गरज आहे असं वाटत नाही. त्यांना खेळात सातत्य राखावं, आणि जे काही करत आहेत त्याचा आनंद घ्यावा. ऑस्ट्रेलियाचा पराभव करतील यात काही दुमत नाही'.
वेदा कृष्णमुर्ती आणि के एल राहुल चांगले मित्र असून तिने यावेळी के एल राहुल उत्कृष्ट पद्धतीने खेळत असून, तो लवकरच कमबॅक करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
रविवारपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. या मालिकेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्यासाठी सर्वांत मोठी स्पर्धा होईल. कारण, जो संघ ४-१ किंवा ५-० अशा मोठ्या फरकाने बाजी मारेल, तो अव्वल स्थान पटकावेल. त्यामुळे दोन्ही संघांकडे खूप संधी आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारताकडे अधिक संधी असल्याचे म्हटले जाते.