Join us  

Virat Kohli Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाचा 'विराट' विजय! अफगाणिस्तानला पळता 'भुवी' थोडी..

Asia Cup 2022 IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 10:47 PM

Open in App

Virat Kohli Bhuvneshwar Kumar, Asia Cup 2022 IND vs AFG: आशिया चषकातून आधीच बाहेर पडलेल्या भारतीय संघाने आज स्पर्धेचा शेवट गोड करत अफगाणिस्तानवर १०१ धावांनी 'विराट' विजय मिळवला. चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या विराट कोहलीच्या शतकाने (नाबाद १२२) भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २१२ धावांपर्यंत मजल मारून दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या लोकेश राहुलनेही अर्धशतकी (६१) खेळी करत विराटला चांगली साथ दिली. परंतु स्पर्धेची सुरूवात अतिशय दिमाखात करणाऱ्या अफगाणिस्तानला मात्र अतिशय कडू शेवटाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना २० षटकांत ८ बाद १११ धावाच करता आल्या. भारताच्या भुवनेश्वर कुमारने ४ धावांत ५ बळी टिपत संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

--

अफगाणिस्तानला मिळालेल्या २१३ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना, त्यांच्या सुरूवातीच्या फलंदाजांनी प्रचंड निराशा केली. स्विंगचा बादशाह अशी ओळख असलेल्या भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानचे अक्षरश: कंबरडे मोडले. भुवीने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ४ धावा दिल्या आणि ५ महत्त्वाचे फलंदाज गळाला लावले. सलामीवीर हजरतुल्ला झझाई (०), रहमानुल्ला गुरबाज (०), करिम जनात (२), नजीबुल्लाह झाद्रान (०) आणि अजमतुल्ला ओमरझाई (१) या पाच फलंदाजांना त्याने माघारी पाठवले. इतर गोलंदाजांनीही त्याला झकास साथ दिली. अर्शदीपने मोहम्मद नबीला (७), आर अश्विनने मुजीब उर रहमानला (१८) तर दीपक हुडाने राशिद खानला (१५) तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, रोहित शर्माच्या जागी कर्णधार असलेल्या लोकेश राहुलने नाणेफेक गमावली. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. भारताने या संधीचं सोनं केलं. विराट कोहली आणि लोकेश राहुल या जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी सलामी ठोकली. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केल्यानंतर लोकेश राहुल ४२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या साथीने ६१ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवही ६ धावांत बाद झाला. पण विराट कोहली आणि रिषभ पंत या जोडीने भारताला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी करताना, ६१ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्यात १२ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रिषभ पंतही ३ चौकारांसह २० धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने दोनही बळी टिपले. 

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीभुवनेश्वर कुमारलोकेश राहुल
Open in App