Join us  

कोहलीमुळे कसोटीच्या तिकिटांची मागणी वाढली

IND VS AUS : सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, नंतर त्याची निवड केवळ कसोटी मालिकेपुरती झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 2:31 AM

Open in App

अ‍ॅडलेड : आयपीएलनंतर क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या हायव्होल्टेज कसोटी मालिकेकडे. मात्र पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारताचा कर्णधार मायदेशी परतणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या कसोटी सामन्याच्या तिकिटांची मागणी प्रचंड वाढली असल्याची माहिती मिळाली.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका नेहमीच चुरशीचे रंगते. कांगारुंचे स्लेजिंग आणि त्याला भारतीयांकडून मिळणारे तोडिस तोड उत्तर, यामुळे या दोन संघांतील सामने नेहमिच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामुळेच, आता आयपीएलच्या रोमांचक अनुभवानंतर सर्वांना वेध लागले आहेत ते ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी सामन्यांचे.

या दौऱ्यासाठी सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, नंतर त्याची निवड केवळ कसोटी मालिकेपुरती झाली. कारण, कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे. त्यामुळेच १७ ते २१ डिसेंबरदरम्यान अ‍ॅडलेड येथे दिवस-रात्र होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिकिटांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

मेलबर्न येथील एक कॅफे मालक अंगद सिंग ओबेरॉय यांनी माहिती दिली की, ‘दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. कारण, या सामन्याच्या तिकिटासाठी खूप मोठी मागणी होत आहे. तिकिट संख्या वाढविण्याबाबत आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा करत आहोत. कदाचित प्रेक्षक संख्या २५ हजारांहून अधिक करण्यात येऊ शकेल. मात्र अद्याप कोणतीही माहिती नाही.’  

हा दौरा भारताच्या तुलतेन यजमान ऑस्ट्रेलियासाठी अधिक प्रतिष्ठेचा बनला आहे. कारण, गेल्यावेळी भारताने यजमानांना त्यांच्याच भूमीत पराभूत करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया