rcb women team । मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाला अद्याप एकदाही जेतेपद पटकावता आले नाही. आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL) देखील आरसीबीची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील आरसीबीच्या संघाला आपल्या पहिल्या 5 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आपला महिला संघ संघर्ष करत असल्याचे पाहून किंग कोहली त्यांच्या आधाराला पोहचला. यूपी वॉरियर्सविरूद्धच्या (RCB vs UP) सामन्यापूर्वी विराट कोहलीने आरसीबीच्या संघाची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले.
दरम्यान, आपल्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यूपी वॉरियर्सचा 6 विकेट राखून पराभव करून विजयाचे खाते उघडले. अशातच आरसीबीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये किंग कोहली महिला खेळाडूंना यशाचा मंत्र सांगताना दिसत आहे.
आम्ही IPL जिंकलो नाही - कोहलीआरसीबीच्या महिला संघाला मार्गदर्शन करताना विराटने म्हटले, "मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की, मी 15 वर्षांपासून आयपीएल खेळत आहे आणि अद्याप एकही किताब जिंकू शकलो नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही खूप निराश आहोत. अशा कठीण परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचे असते. असे अजिबात नाही की मी आयपीएल जिंकू शकलो नाही म्हणून जीवनात काहीच करू शकलो नाही. आपल्याला फक्त आपल्या चांगल्या खेळीवर लक्ष केंद्रीत करायला हवे. आम्ही भलेही किताब जिंकला नाही तरी आम्ही देखील जगात बेस्ट आहोत."
RCBने उघडले विजयाचे खातेआरसीबीच्या संघाने साखळी फेरीतील 5 सामने गमावले असून एका सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता फक्त 2 सामने उरले आहेत. यावर कोहलीने संघाला सल्ला देताना म्हटले, "हे पाहा, आपण 110 टक्के कसे देतो हे आपल्या हातात आहे. इतर गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. आपल्याकडे जे काही सामने शिल्लक आहेत, आपल्याला फक्त त्यांच्याकडे लक्ष द्यायचे आहे. पुढे जाण्याची एक टक्काही संधी असेल, तर त्यावरच लक्ष केंद्रित करायला हवे. अशा मानसिकतेने खेळले पाहिजे. जर आपण उर्वरित सर्व सामने जिंकलो तर आपण आपले डोके उंचावून स्पर्धेचा शेवट करू शकतो."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"