भारत आणि दक्षिण आफ्रिका ( India vs South Africa) यांच्यातली तीन कसोटी सामन्यांची मालिका यजमानांनी २-१ अशी जिंकली. पण, या मालिकेतील अखेरच्या सामन्यात DRS वादानं हवा केली. केपटाऊनमध्ये खेळला गेलेल्या या सामन्यात तंत्रज्ञानावर पुन्हा सवाल केले गेले. आर अश्विनच्या चेंडूवर आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर हा LBW असल्याचे स्पष्ट होते आणि म्हणूनच मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. पण, DRS मध्ये चेंडू यष्टींवरून जात असल्याचे दिसले अन् एल्गरला जीवदान मिळाला. या निर्णयावर मैदानावरील पंचांसोबत अश्विन व टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांन तीव्र नाराजी व्यक्त केली. दोघंही स्टम्प माइक जवळ जाऊन बडबडले. सामन्यानंतर विराटनं स्वतःच्या व सहकाऱ्यांच्या वागण्याचे समर्थन केले आणि बाहेर बसून टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले.
कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या या वागण्यावर काही माजी खेळाडूंनी टीका केली. यात गौतम गंभीर, मायकेल वॉन, शेन वॉर्न आदी दिग्गजांचा समावेश आहे. आफ्रिकेनं चौथ्या दिवशी ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि मालिका २-१ अशी खिशात घातली. सामन्यानंतर विराट म्हणाला,''मला या वादावर काहीच टिप्पणी करायची नाही. मैदानावर नेमकं काय घडलं, ते आम्हाला कळतं. पण, बाहेरील लोकं त्या गोष्टीला समजू शकत नाहीत. तो निर्णय जर आमच्या बाजूनं लागला असता तर सामन्याला कलाटणी मिळाली असती. मी जे काही वागलो त्याला काहीतरी संदर्भ होता. माझ्यासाठी प्रयत्न करणे आणि खेळाडूंनी जे केलं त्याचे समर्थन करणे महत्त्वाचे होते.''
गौतम गंभीरची टीका
"विराट कोहली हा अपरिपक्व खेळाडू आहे. भारतीय कर्णधाराने अशा प्रकारे स्टंप माईकशी बोलणं खूपच विचित्र आणि चुकीचं आहे. असे चाळे करून तुम्ही कधीच युवा पिढीचे आदर्श बनू शकत नाही. पहिल्या डावात विराटला स्वत:ला DRS मध्ये नाबाद ठरवण्यात आले. त्यावेळी तो ५०-५० टक्क्याचा भाग होता. पण तेव्हा विराट शांत राहिला. मयंक अग्रवालच्या बाबतीतही विराट गप्प राहिला. पण यावेळी त्याने प्रतिक्रिया दिली. मला असं वाटतं की या मुद्द्यावर राहुल द्रविडने विराट कोहलीशी नक्कीच चर्चा केली पाहिजे", असं गौतम गंभीर म्हणाला.
सामन्यात नेमकं काय झालं? भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनं २१० धावा केल्या. दुसऱ्या डावात रिषभ पंतनं ४ बाद ५८ धावांवरून टीम इंडियाचा डाव सावरताना विराटसोहत ९४ धावांची भागीदारी केली. विराट माघारी परतला अन् भारतीय फलंदाजांनी रांग लावली. भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर गडगडला. त्यात रिषभच्या नाबाद १०० धावा होत्या. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या . भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा केल्या. किगन पीटसरन ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावांवर माघारी परतला. व्हॅन डेर ड्युसेन व टेम्बा बवुमा यांनी अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. वबुमा ३२, तर ड्युसेन ४१ धावांवर नाबाद राहिले.