मुंबई : 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद पटकावून दिल्यानंतर विराट कोहली हे नाव क्रिकेट वर्तुळात चर्चेत आले. त्यावेळी त्याच्या फलंदाजीच्या शैलीशी कुणाचीही तुलना झाली नव्हती. मात्र, आता क्रिकेट जगतात कोहलीच्याच नावाचा डंका आहे. नुकतेच त्याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम केला. तसेच 2018 या वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने 14 सामन्यांत 133.55 च्या सरासरीने 1202 धावा चोपल्या आहेत.
महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कोहलीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले,'' कोहली ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता कोणताही विक्रम तो मोडू शकतो. तो फलंदाजीतील सर्व विक्रम नावावर करू शकतो... सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकं, ही सर्व विक्रम कोहली मोडू शकतो. त्याची फिटनेस कौतुकास्पद आहे. तंदुरुस्ती पाहतो तो 5-7 वर्ष नाही तर 10 वर्ष खेळणार आहे. सचिनप्रमाणे कोहली 40 वर्ष खेळला, तर तो कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्व विक्रम नावावर करेल.''
कोहली आज 30वा वाढदिवस साजरा करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 54.57 , वन डे 59.83 आणि ट्वेंटी-20त 48.88 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.