Join us

WTC Final: विराट कोहलीला सचिनच्या 'या' महापराक्रमाची बरोबरी करण्याची संधी

सर डॉन ब्रॅडमन यांचाही एक मोठा विक्रम विराट या सामन्यात मोडू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 18:53 IST

Open in App

Virat Kohli Sachin Tendulkar Records, WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू ओव्हलवर पोहोचले असून या मोठ्या सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. या सामन्यात टीम इंडियाचा घातक फॉर्ममध्ये परतलेला फलंदाज विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. तो डॉन ब्रॅडमनचा मोठा विक्रम मोडू शकतो. याशिवाय महान सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करण्याचीही त्याला चांगली संधी आहे.

कोहलीच्या नावावर होऊ शकतो हा विक्रम!

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज डॉन ब्रॅडमन यांचा एक विक्रम विराट कोहली आपल्या नावावर करू शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या WTC फायनलमध्ये विराट कोहलीने 84 धावा केल्या तर एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ब्रॅडमनना मागे टाकेल. कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये 92 सामने खेळून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4,945 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 16 शतके आणि 24 अर्धशतकेही झळकली आहेत. ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 5,028 धावा केल्या आहेत.

सचिनच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी

विराट कोहली या सामन्यात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाचीही बरोबरी करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 2 फलंदाजांनी एका संघाविरुद्ध 5000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. पहिले डॉन ब्रॅडमन आणि दुसरा सचिन तेंडुलकर. सचिनने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरुद्ध 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५५ धावा केल्या तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरेल.

कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत 108 सामने खेळताना 49 च्या सरासरीने 8416 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 28 शतके आणि अनेक अर्धशतकेही झळकली आहेत. नाबाद 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासचिन तेंडुलकरविराट कोहलीसर डॉन ब्रॅडमन
Open in App