Virat Kohli Captaincy Issue : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. क्रिकेटचे सामने सुरू असताना विराट नेहमीच चर्चेत असतो पण यावेळी मैदानाबाहेर असताना तो चर्चेचा विषय होता. त्यामागचं कारण म्हणजे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद. भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून विराटला हटवून रोहित शर्माला नवी जबाबदारी देण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला. त्यानंतर विराट कोहलीचे चाहते काहीसे नाराज झाले. विराटनेही पत्रकार परिषद घेत या निर्णयावर थोडीशी नाराजी दर्शवली. पण, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने निवड समितीची बाजू क्रिकेटप्रेमींसमोर मांडत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. गांगुलीने केलेला प्रयत्न कितपत सफल ठरला हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण सौरव गांगुलीच्या स्पष्टीकरणानंतर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर चांगलेच संतापले. निवड समितीच्या वतीने सौरव गांगुलीने बोलण्याची गरजच नव्हती असं रोखठोक मत त्यांनी मांडलं.
"विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून जो काही वादंग झाला तो संपूर्ण प्रकार दुर्दैवी आहे. क्रिकेट मंडळाने असे संवेदनशील विषय थोडे नाजूकपणे हाताळायला हवे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे, निवड समितीच्या वतीने बोलण्याचा सौरव गांगुलीचा काय संबंध? त्याने निवडकर्त्यांची बाजू फॅन्सपुढे मांडणं चूक आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आहे. संघनिवड किंवा कर्णधारपदावरून कोणत्याही प्रकारचा वाद चर्चिला जात असेल तर त्यावर निवड समिती अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे होतं. गांगुलीने त्यांची बाजू मांडल्यावर विराटनेदेखील त्याच्या बाजून स्पष्टीकरणं देणं स्वाभाविकच होतं. पण मूळ मुद्दा असा आहे की हा संपूर्ण वाद निवड समिती अध्यक्ष आणि संघाचा कर्णधार यांच्यामधला होता. त्यामुळे कर्णधाराची निवड असो किंवा त्याची हकालपट्टी असो, गांगुलीचा त्याच्याशी काहीही संबंध येत नाही. त्याने गप्प बसायला हवं होतं", अशी तीव्र शब्दांत वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. नक्की काय आहे हा वाद?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अचानक विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला टी२० पाठोपाठ एकदिवसीय संघाचे कर्णधार केल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर विराटने पत्रकार परिषदे घेतली. मला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं विराटने सांगितलं. तसेच, या निर्णयाच्या केवळ ४८ तास आधी मला याबद्दल कल्पना दिल्याचेही त्याने स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेनंतर क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका करण्यास सुरूवात केली. त्यावेळी, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्वत: पुढे येत घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं. 'विराटने टी२० कर्णधारपद सोडू नये असं बीसीसीआय आणि निवड समितीला वाटत होतं. त्याला तशी विनंती करण्यात आली होती. पण त्याने टी२० कर्णधारपद सोडलं. अशा परिस्थितीत निर्धारित षटकांच्या क्रिकेटसाठी दोन वेगवेगळे कर्णधार असणं योग्य नसल्याची भावना निवड समितीने व्यक्त केली आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला', असं गांगुलीने स्पष्टीकरण दिलं होतं.