Virat Kohli: क्रिकेटच्या मैदानात आपल्या तुफान फलंदाजीने लोकांची मने जिंकणारा भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला लक्झरी गाड्यांची खूप आवड आहे. पण तुम्हाला माहितीये का, की विराट कोहलीची पहिली गाडी कोणती होती? एवढंच नाही तर विराटने त्या गाडीची निवड का केली होती? या रंजक गोष्टीचा खुलासा खुद्द विराट कोहलीने केला आहे.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत विराट कोहली म्हणाला की, कारच्या बाबतीत माझ्यात मोठा बदल झाला आहे. पूर्वी मला स्पोर्ट्स कारची खूप क्रेझ होती आणि स्पोर्ट्स कार घेण्याची उत्सुकता होती. पण, कालांतराने गोष्टी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतो. आता मी कुटुंबाचा विचार करतो आणि त्याच विचाराने आरामदायक एसयूव्ही निवडतो.
विराटची पहिली कार:
पहिली कार कोणती होती, हे विचारल्यावर विराट म्हणतो, मी स्वतः खरेदी केलेली पहिली कार टाटा सफारी होती. टाटा सफारीबाबत विराट म्हणतो, टाटा सफारी हे त्याकाळी असे वाहन होते, जे रस्त्यावर धावताना समोरुन येणारा बाजूला व्हायचा. सफारीची एक वेगळीच ओळख त्या काळात होती. त्यामुळेच मी सफारी घेण्याचा निर्णय घेतला होता.
अशी होती टाटा सफारीची क्रेझ:
टाटा मोटर्सने 1998 मध्ये टाटा सफारी लॉन्च केली होती. या एसयूव्हीने बाजारात येताच तरुणांमध्ये जबरदस्त पकड निर्माण केली होती. मोठ मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी आणि राजकारणी यांनाही या एसयूव्हीची आवड निर्माण झाली होती. फर्स्ट जनरेशन सफारी प्रशस्त 7-सीटर एसयूव्ही होती. आजही बाजारात या एसयूव्हीची क्रेझ पाहायला मिळते. आजही अनेकजण ही गाडी घेतात.