Virat Kohli Wasim Jaffer, IND vs SL 1st ODI: श्रीलंकेविरूद्ध पहिल्या वन डे सामन्यात भारताने धडाकेबाज सुरूवात केली. गुवाहाटीच्या पहिल्या वन डे सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) , विराट कोहली आणि केएल राहुल या तीन वरिष्ठ खेळाडूंनी पुनरागमन केले. टी२० मालिकेत या तिघांना विश्रांती देण्यात आली होती. पण आज त्या तिघांनाही संघात संधी मिळाली. केएल राहुलने पुनरागमनाचा फारसा फायदा उचलला नाही. पण कर्णधार रोहित शर्माने ८३ धावा करून तर विराट कोहलीने ११३ धावा करत भारतीय चाहत्यांना खुश केले. विराटच्या दमदार शतकाचे चहुबाजुंनी कौतुक झाले. तशातच, भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर याने विराटबद्दल एक भन्नाट प्रतिक्रिया दिली आणि त्याची तुलना जंगलाचा राजा सिंहाची केली.
विराट कोहली दमदार कामगिरी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. विराटने ८७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या साथीने ११३ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ७३वे तर वन डे क्रिकेटमधील सलग दुसरे शतक ठरले. गेल्या सामन्यात बांगलादेश विरूद्धही त्याने शतक मारले होते. ५० षटकांमध्ये भारताला विराटच्या शतकामुळेच ३७३ धावापर्यंत मजल मारता आली. त्याच्या या खेळीनंतर वासिम जाफरने एक भननाट ट्विट केले. 'शेर के मुँह खून लग गया है, इस साल बहोत शिकार होने वाले है', असा हिंदी शेर लिहीत त्याने प्रतिस्पर्धी संघांना ताकीद दिली.
दरम्यान, शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सलामीनंतर विराट कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करताना विराटने सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडला. शुबमन आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. २०व्या षटकात दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुभमन ६० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला. त्याने रोहितसोबत १४३ धावांची भागीदारी केली. रोहितने नंतर फटकेबाजी करत ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावा कुटल्या. त्याचे शतक हुकल्याने चाहते नाराज झाले. पण विराटने मात्र दमदार कामगिरी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.