Gautam Gambhir Virat Kohli Interview: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्यातील मुलाखतीचा व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे. या मुलाखतीत विराट कोहलीबाबत एक वेगळीच गोष्ट गौतम गंभीरने सगळ्यांना सांगितली. कदाचित विराटच्या चाहत्यांनाही ही गोष्ट माहिती नसेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने भगवान शंकराच्या मंत्रोच्चाराच जप केला होता. गौतम गंभीरने बीसीसीआय टीव्हीवरील मुलाखतीत विराटशी मजेशीर संवाद साधला. अनेक विषयांवर गप्पा मारल्या. त्याच वेळी त्याने विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील एक आठवण सांगितली.
२०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने प्रत्येक चेंडूपूर्वी भगवान शंकराचे नाव घेतले होते. गंभीरने सांगितले की, विराटने कांगारू गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नमः शिवायचा जप केला होता. विराट कोहलीने त्या कसोटी मालिकेत एकूण १,०९३ चेंडू खेळले होते. याचाच अर्थ की त्याने तेवढ्याच वेळा भगवान शंकराचा जप केला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहलीची कामगिरी
२०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी विराट कोहलीसाठी ती मालिका खूप खास होती. याच मालिकेत विराट कोहली कसोटी कर्णधार झाला. धोनीने अचानक कर्णधारपद सोडले आणि जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली आणि त्याच मालिकेत त्याने खूप धावा केल्या. विराटने त्या मालिकेत ८६ पेक्षा जास्त सरासरीने ६९२ धावा केल्या होत्या. त्याने एकूण ४ शतके आणि एक अर्धशतक झळकावले.
गौतम गंभीरने सांगितले की, विराट कोहलीने त्या दौऱ्यात जी फलंदाजी केली तशी फलंदाजी इतर कुठलाच फलंदाज करू शकलेला नाही, असे मला वाटते. गौतम गंभीरने सांगितले की २००९ मध्ये झालेल्या नेपियर कसोटीत तो स्वतः याच झोनमध्ये होता. त्याने ४३६ चेंडूंचा सामना केला होता. तेव्हा लक्ष्मणने नाबाद १२४ धावा केल्या होत्या. गंभीरने सांगितले की, त्या सामन्यादरम्यान तो हनुमान चालिसाचा जप करत होता.