कोलकाता - भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर बरोबर तुलना होत असलेल्या कर्णधार विराट कोहलीने सोमवारी क्रिकेट करीयरमध्ये आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोक्याच्या क्षणी शानदार शतक झळकवून विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवून दिला. विराटचे कसोटी क्रिकेटमधील हे 18 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 वे शतक ठरले.
वनडेमध्ये विराटने आतापर्यंत 32 शतके झळकावली आहेत. संघाला गरज असताना विराटने नेहमीच आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ बॅकफूटवर होता. पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात भारताच्या तीन विकेट झटपट गेल्यानंतर भारताचा डाव दबावाखाली होता. पण विराटने एकबाजू लावून धरली आणि लंकेच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्याने 119 चेंडूत नाबाद 104 धावांची खेळी करताना 12 चौकार आणि दोन षटकार लगावले.
विराट सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक धावांची, शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल का ? यावर नेहमीच चर्चा झडत असतात. सध्याचा त्याचा फॉर्म पाहता नक्कीच तो या उंचीवर पोहोचू शकतो. वनडे आणि टेस्टमध्ये मिळून सचिनच्या नावावर 100 शतकांचा विक्रम आहे. विराटने आज श्रीलंकेविरुद्ध निम्म्या म्हणजे शतकांच्या अर्धशतकांचा टप्पा गाठला.