मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा अकरा वर्षांचा प्रवास पूर्ण झाला आहे. जे स्वप्न कोहलीने लहानपणी पाहिले होते, ते 11 वर्षांपूर्वी सत्यात उतरले होते. याबाबतचे एक ट्विट कोहलीने केले असून चाहत्यांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
18 ऑगस्ट 2008 हा दिवस कोहलीसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस होता. कारण या दिवशी कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज त्या गोष्टीला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 11 वर्षांमध्ये कोहलीने एकूण 68 शतके लगावली आहेत. सध्याच्या घडीला कोहली हा जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे.
कोहलीने 2008 साली श्रीलंकेविरुद्ध दांबुला येथे एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. पण आपल्या पहिल्याच सामन्यात कोहलीला फक्त 12 धावाच करता आल्या होत्या. कोहलीने पहिले शतक झळकावले ते 2009 साली. पण सध्याच्या घडीला सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 43 शतके लगावली आहेत. आता त्याच्यापुढे फक्त भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीने 25 शतके पूर्ण केली आहेत.
कोहलीने 2008 साली जेव्हा पदार्पण केले होते, तेव्हाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याचबरोबर सध्याच्या एक फोटोही त्याने पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये कोहलीने लिहिले आहे की, " या दिवशीच 2008 साली मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. आता या यात्रेला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. तुम्हा साऱ्यांनाही योग्य मार्गक्रमण करत आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य मिळो."
चाहत्यांनीही विराटच्या या पोस्टला उंदड प्रतिसाद दिला आहे. ' विराटिझ्मची 11 वर्षे' असा हॅशटॅग चाहत्यांनी चालवला आहे. सध्याच्या घडीला कोहली हा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने दोन शतके लगावली होती. त्याचबरोबर दहा वर्षांमध्ये 20 हजार धावा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.